पीटीआय, नवी दिल्ली
‘‘भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाने हे सिद्ध केले, की संकल्पाचे सूर्य चंद्रावरही उगवतात. ही मोहीम कुठल्याही परिस्थितीत जिंकायचेच, या ‘नव्या भारता’चे प्रतीक बनली आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी काढले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक संवाद सत्राच्या १०४ व्या भागात मोदींनी श्रोत्यांशी संवाद साधला.
देशवासीयांना आपल्या कुटुंबातील सदस्य संबोधून मोदी म्हणाले, की हे यश प्रत्येकाच्या प्रयत्नाने साकारले आहे. ‘चांद्रयान-३ ’च्या यशामुळे श्रावणातील सणांचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे. चांद्रयानाला चंद्रावर पोहोचून तीन दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही हे यश इतके मोठे आहे की त्याची चर्चा करावी तितकी कमीच आहे. चांद्रयान मोहीम नारीशक्तीचे बोलके उदाहरण असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की त्याला नारीशक्तीचे सामथ्र्य लाभल्याने अशक्य गोष्टीही शक्य झाल्या. या मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंता सक्रिय सहभागी होत्या. प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. भारतीय कन्या आता अनंत अवकाशालाही आव्हान देत आहेत. जेव्हा एखाद्या देशाच्या मुली इतक्या महत्त्वाकांक्षी बनतात तेव्हा त्या देशाला विकासापासून कोण रोखू शकेल?
हेही वाचा >>>“चांद्रयान मोहीम ही विज्ञान आणि उद्योगाचं यश”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
‘अभी तो सूरज उगा है’ ही कविता वाचून पंतप्रधान म्हणाले की, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयानाने हे सिद्ध केले की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवतात. आज प्रत्येकाची स्वप्ने मोठी असून, प्रयत्नही अथक आहेत. त्यामुळेच देशाने एवढी उंची गाठली आहे.