पीटीआय, बंगळूरु
भारताच्या महत्त्वाकांक्षी तिसऱ्या चंद्र मोहिमेतील ‘चंद्रयान-३’ने सोमवारी आणखी एक टप्पा पूर्ण केला. हे यान चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले असून चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ आले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) दिली.
१४ जुलै रोजी प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्रयान-३ ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर ६ आणि ९ ऑगस्ट रोजी दोन कक्षा पूर्ण करून आता अगदी जवळच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ‘‘आता ऑर्बिट सर्कुलायझेशन टप्पा सुरू झाला असून चांद्रयान-३ची चंद्रापासूनची कक्षा १५० किलोमीटर १७७ किलोमीटर इतकी करण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता आणखी एकदा कक्षा बदलली जाईल.
चांद्रयान-३ ला चंद्राच्या १०० किलोमीटर इतक्या अंतरावर आणले जाईल आणि त्यानंतर लँडर आणि रोव्हरचे प्रॅपल्शन मॉडय़ूल वेगळे केले जाईल. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ अलगद उतरविले जाईल.