पीटीआय, बंगळुरू : ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पार पडला. मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडय़ूल) लँडर मॉडय़ूल विलग करण्यात यश आले असून आता या लँडिंग मॉडय़ूलचा चंद्र पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची (लँडिंग) सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे.
‘विक्रम’ हा लँडर आणि त्यावर असलेला ‘प्रग्यान’ हा रोव्हर मुख्य यानापासून यशस्वीरीत्या विलग झाल्याचे ‘इस्रो’ने एक्स या समाजमाध्यम खात्यावर जाहीर केले. आता विलग झालेले लँडर मॉडय़ूलची चंद्राभोवतीची कक्षा अधिक घटविली जाणार असून प्रोपल्शन मॉडय़ूल येते काही महिने किंवा वर्षे आहे त्याच कक्षेमध्ये चंद्रभोवती परिभ्रमण करेल आणि चंद्र तसेच पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास सुरू ठेवेल, असे इस्रोने स्पष्ट केले. २३ ऑगस्ट रोजी या मोहिमेतील सर्वाधिक अवघड आणि शेवटचा टप्पा असेल. या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे अवतरण केले जाईल. चंद्रयान-२ मोहीम याच टप्प्यावर अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने या प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले असून यावेळी निश्चित यश येईल, असा संशोधकांना विश्वास आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3 चे एक पाऊल पुढे, चंद्रावर उतरण्याच्या पूर्वतयारीला झाली सुरुवात
आतापर्यंत अस्पर्शित राहिलेल्या चंद्राच्या दक्षिण धृवावर ‘विक्रम’ उतरणार आहे. त्यानंतर त्यावर बसविलेला ‘प्रग्यान’ हे स्वयंचलित यान चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल आणि तेथील माती, दगड आदीचा अभ्यास करेल. या मोहिमेमुळे चंद्राबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची भारताबरोबरच जगभरातील संशोधकांना अपेक्षा आहे.
रशियाबरोबर ‘स्पर्धा’
चंद्रयान-३च्या जोडीने रशियाचे ‘लुना-२५’ हे यानदेखील चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रयानाने लांबचा मार्ग स्वीकारला असताना हलक्या वजनाचे आणि अधिक इंधन वाहण्याची क्षमता असलेले लूना-२५ अवघ्या ११ दिवसांमध्ये चंद्राजवळ पोहोचेल. २३ किंवा २४ ऑगस्ट विक्रम उतरणार असताना त्यापूर्वीच २१ ते २३ ऑगस्टदरम्यान ‘लुना’चा लँडर दक्षिण धृवावरच उतरेल. रशियाने १९७६मधील ‘लुना-२५’नंतर प्रथमच, सुमारे पाच दशकांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा – विश्लेषण : ‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?
महत्त्वाचे टप्पे
१४ जुलै – चंद्रयान-३ चे प्रक्षेपण
१ ऑगस्ट – पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर
५ ऑगस्ट – चंद्राच्या कक्षेत प्रवेश
६, ९, १४, १६ ऑगस्ट – चंद्राभोवतीच्या कक्षांमध्ये घट
१७ ऑगस्ट – ‘विक्रम’चे विलगीकरण
२३ ऑगस्ट (प्रस्तावित) – ‘विक्रम’चे अवतरण
असे होणार लँडिंग
विलग झालेल्या ‘विक्रम’चा वेग कमी केला जाईल. वेग कमी झाल्यानंतर त्याची कक्षा कमी होईल आणि तो चंद्रपृष्ठाच्या अधिक जवळ जाईल. २३ ऑगस्ट रोजी कमाल कक्षा (अॅपोल्युन) १०० किलोमीटर आणि किमान कक्षा (पेरिल्युन) ३० किलोमीटर झाल्यानंतर ‘सॉफ्ट लँडिंग’ची प्रक्रिया पार पाडली जाईल. यामध्ये यानाचा वेग कमीत कमी ठेवण्याबरोबरच सध्या आडव्या स्थितीत असलेले (हॉरिझाँटल) यान उभ्या स्थितीत (व्हर्टिकल) आणण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याचे इस्रोमधील सूत्रांनी सांगितले.