ISRO Chandrayaan-3 Moon Mission Landing Live Streaming: लँडर मॉड्यूल (LM) ने त्याचे दुसरे आणि अंतिम डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारताचे चांद्रयान-3 हे २० ऑगस्टला चंद्राच्या आणखीन जवळ पोहोचले आहे. आता, लँडर एका कक्षेत पोहोचला असून चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू अवघ्या २५ किमी दूर आहे तर सर्वात दूरचा बिंदू १३४ किमी अंतरावर आहे. यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) माहिती दिली असून आता मॉड्युलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त ठिकाणी लँडिंगसाठी सूर्योदयाची प्रतीक्षा आहे असेही सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रावरील भारताची तिसरी मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. काही आठवड्यांनंतर, ५ ऑगस्ट रोजी लँडरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि आता चांद्रयान ३ लँडिंगसाठी सज्ज झाले आहे. हे लँडिंग नेमके कधी व कुठे होईल तसेच तुम्हाला ते कुठे पाहता येणार आहे याविषयी जाणून घेऊया..

चांद्रयान- ३ चे लँडिंग कधी आणि कुठे होईल?

लँडर मॉड्यूल २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, जर हे लँडिंग यशस्वी झाले तर भारत हा पराक्रम साध्य करणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश बनणार आहे. इस्रोने एका ट्विटद्वारे ऐतिहासिक लँडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली असून २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.

इस्रोने यापूर्वी माहिती दिली होती की लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श झाल्यानंतरही, त्याचे मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी चंद्राभोवती फिरत राहील.

हे ही वाचा<< Chandrayaan 3 चंद्राकडे निघाले, मात्र चंद्राजवळ जाणारे पहिले यान कोणत्या देशाचे होते? कधी गेले होते?

चांद्रयान ३ चे लँडिंग कधी आणि कुठे पहावे?

ISRO च्या माहितीनुसार, जगभरात कुठूनही तुम्ही चांद्रयान-3 मोहिम लाईव्ह पाहू शकता. बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून हे स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपित केले जाईल. आपण ISRO वेबसाइट, YouTube, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल इथे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या मुख्य पृष्ठावरसुद्धा आपल्याला माहिती मिळवता येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 landing live streaming when where and how to watch isro chandrayaan 3 moon landing live telecast svs
Show comments