श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. या चांद्रमोहिमेचे तीन प्रमुख टप्पे आहेत.
पृथ्वीला निरोप..
चंद्रयान-३चा मार्ग चा चंद्रयान-२ सारखा आहे. हे यान पृथ्वीभोवती पाच कक्षेतील आवर्तन पूर्ण करेल. प्रत्येक वेळी ते पृथ्वीपासून दूर जाणारे अंतर वाढवेल. पाचवे आवर्तन पूर्ण केल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जाऊ लागेल.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश
पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील आवर्तनाप्रमाणेच ‘चंद्रयान-३’ चंद्राभोवती चार वेळा प्रदक्षिणा घालेल आणि प्रत्येक वेळी चंद्राजवळ जाईल. अखेरीस ते १०० किमी ७ १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचेल. या टप्प्यावर लँडर प्रोपल्शन मॉडय़ूलपासून वेगळे होते आणि त्याची कक्षा बदलते. त्यानंतर, लँडरचे अलगत अवतरण प्रक्रिया सुरू होते.
चंद्रावर अवतरण
पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास सुमारे एक महिना लागण्याचा अंदाज आहे. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. चंद्रावर अवतरण केल्यावर, ते एका चांद्र दिवसासाठी कार्य करेल.
०१ = यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे
०२ = चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)
०३ = ‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर
रोव्हर डिस्कव्हरी
चंद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर एक रोव्हर उतरवेल आणि चंद्राचा शोध घेण्याची क्षमता सिद्ध करेल. रोव्हर त्याच्या स्थानाजवळ वैज्ञानिक प्रयोग करेल आणि चंद्राच्या वातावरणाबाबत मौल्यवान माहिती गोळा करेल.
काय माहिती मिळवणार?
चंद्रयान-३च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, भूवैज्ञानिक वैशिष्टय़े आणि इतर माहिती मिळविली जाणार आहे. चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण, चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जणार आहे.
दोन दशकांतील यश
* १५ ऑगस्ट २००३ : तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या चंद्रयान मोहिमेची घोषणा केली.
* २२ ऑक्टोबर २००८ : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-१’ अवकाशात झेपावले. पीएसएलव्ही-सी ११ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
* ८ नोव्हेंबर २००८ : ‘चंद्रयान-१’ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
* १४ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान-१ हे ऑर्बिटरपासून वेगळे झाले आणि नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर धडकले. चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी हे यान उतरविण्यात आले.
* २८ ऑगस्ट २००९ : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यानंतर या मोहिमेचा अखेर अंत झाला.
* २२ जुलै २०१९ : श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण करण्यात आले. ‘एलव्हीएम३- एम१’ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे यान अंतराळात पाठविण्यात आले.
* २० ऑगस्ट २०१९ : ‘चंद्रयान-२’चा चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश.
* २ सप्टेंबर २०१९ : चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत १०० किलोमीटरवर चंद्राभोवती फिरताना विक्रम लँडर वेगळे झाले. तथापि चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर उंचीवर लँडरशी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला. हे यान कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
* १४ जुलै २०२३ : श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण करण्यात आले. * २३/२४ ऑगस्ट २०२३ : इस्रोच्या शास्त्रज्ञांचे या दिवशी ‘चंद्रयान-३’चे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग) करण्याचे नियोजन केले आहे. ज्यामुळे भारत हा पराक्रम साध्य करणाऱ्या बडय़ा राष्ट्रांमध्ये सामील होईल.