भारताने आज एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोने १४ जुलै रोजी हे यान अंतराळात पाठवलं होतं. श्रीहरीकोटा येथून हे यान चंद्राच्या दिशेनं झेपावलं आणि तब्बल ४१ दिवसांचा प्रवास करून चंद्रावर उतरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशस्वी लँडिंगनंतर आता विक्रम लँडरचे HAZARD डिटेक्शन कॅमेरे सुरू होतील. लँडिंगनंतरचे धोके तपासून सर्व काही ठीक आहे हे लक्षात आल्यानंतर चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर फिरेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं परिक्षण करेल. चंद्रावर पाणी आणि खनिजे असल्याचे दावे केले जातात. त्याविषयीची माहिती गोळा करून इस्रोला पाठवेल.

चांद्रयान आणि प्रज्ञान रोव्हर आता त्याचं पुढचं काम चोख करेल असा विश्वास इस्रोच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चांद्रयान ३ ने यशस्वी लँडिंगनंतर इस्रोला एक खास संदेश पाठवला आहे. हा संदेश इस्रोने ट्विटरवर शेअर केला आहे. “मी माझ्या नियोजित ठिकाणी पोहोचलोय आणि तुम्हीसुद्धा!” असा मेसेज चांद्रयानाने पाठवला आहे. तसेच भारताचं अभिनंदन केलं आहे.

इस्रोने या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. एखाद्या आंतराळ मोहिमेवरील हा सर्वात कमी खर्च आहे. रशियाच्या लुना २५ या मून मिशनचं बजेट १५०० कोटी रुपयांहून अधिक होतं.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : मोहिमेवरील खर्च किती? लँडिंगनंतर पुढे काय? जाणून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

भारताचं चांद्रयान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आंतराळ यान उतरवणं हे सर्वात अवघड आहे. कारण येथे सपाट पृष्ठभाक नाही, तसेच येथे तापमान उणे २३० उंश सेल्सिअस इतकं आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेच इस्रोने आपलं यान दक्षिण ध्रुवावर उतरवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 message to isro i reached my destination and you too asc
Show comments