नवी दिल्ली :भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान ३’ मोहिमेची तारीख निश्चित झाली असून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता एलव्हीएम-३ या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. २३ किंवा २४ तारखेला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ‘इस्रो’ने गुरूवारी जाहीर केले. चंद्रयान-२ मोहिमेतील अपयशातून धडा घेत ‘लँडर’ आता अधिक शक्तिशाली करण्यात आला आहे.
तमिळनाडूतील श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपणतळावरून चंद्रयान ३ चे उड्डाण होईल. चंद्रयानाच्या सर्व चाचण्या झाल्या असून ‘लाँच व्हेईकल मार्क थ्री’ या प्रक्षेपणयानावर ते सिद्ध करण्यात आले आहे. चंद्रयान-३ मोहिमेचे दोन प्रमुख भाग असतील. ‘चंद्राचे विज्ञान’ (सायन्स ऑफ द मून) याअंतर्गत चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावील प्लाझ्माचे प्रमाण तसेच लँडिंग स्थळाच्या आसपास असलेल्या चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जाणार आहे. तर ‘चंद्रावरून विज्ञान’ (सायन्स फ्रॉम द मून) याद्वारे चंद्राच्या कक्षेमधून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. या दुसऱ्या संशोधनासाठी चांद्रयान-२मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. चांद्रयान-२मध्ये केवळ लँडर (चांद्रपृष्ठावर उतरणारे वाहन) आणि रोव्हर (चांद्रपृष्ठावर चालणारे वाहन) होते. चांद्रयान-३मध्ये या दोन वाहनांखेरीज प्रोपल्शन (प्रेरक) हे तिसरे वाहन बसविण्यात आले आहे. यामुळे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवरील वर्णपटासह अन्य निरीक्षणे नोंदविता येणार आहेत. याखेरीज अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था, ‘नासा’ची काही उपकरणेही चांद्रयान-३मार्फत चंद्राकडे पाठविण्यात येणार आहेत.
२३ किंवा २४ तारखेला चांद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष सोमनाथ एस. यांनी जाहीर केले. चंद्रावर १४-१५ दिवस सूर्यप्रकाश तर १४-१५ दिवस अंधार असतो आणि लँडिंगसाठी सूर्यप्रकाश असणे आवश्यक असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन ‘विक्रम’ उतरविले जाईल, अशी माहिती मोहिमेतील संशोधकांनी दिली.
‘अलगद’ उतरण्याची सिद्धता
’चंद्रयान-२मध्ये लँडरच्या पायांची क्षमता २ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याची होती. त्यामुळे चांद्रपृष्ठावर उतरताना हे वाहन टिकू शकले नाही आणि ‘रोव्हर’ही चालू शकला नाही. ’मात्र आता चंद्रयान-३मधील लँडरच्या पायांची क्षमता ३ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याइतकी वाढविण्यात आली आहे. शिवाय अधिक अलगदपणे उतरता यावे व परत येण्याचा प्रयत्न करता यावा, यासाठी लँडरमध्ये अधिक इंधनही ठेवण्यात आले आहे.