४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ऐतिहासिक क्षण पाहणार का असा प्रश्न उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी तीन दिवसीय दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.
चांद्रयान २ च्या लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरू येथून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहिले होते. तेव्हा चांद्रयान २ मोहिम थोडक्यासाठी अपयशी ठरली होती. परंतु, त्यावेळी इस्रोचे संचालक सिवन यांचं मोदींनी सात्वंन करत त्यांना मिठी मारली होती. आजचा हा ऐतिहासिक क्षणही पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून पाहणार आहेत. व्हरच्युअली या कार्यक्रमाचे ते साक्षीदार होणार आहेत.
हेही वाचा >> Chandrayaan-3: इतिहास घडविण्यास ‘इस्रो’ सज्ज; ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडरचे आज चंद्र पृष्ठावर अवतरण
चांद्रयान ३ मोहिमेसाठी इस्रो सज्ज
चंद्रावर जाणाऱ्या भारतीय अंतराळयानावरील सर्व यंत्रणा उत्तमपणे काम करत आहेत आणि लँडिंगच्या दिवशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अपेक्षित नाही, असे देशाच्या अंतराळ संस्थेने सोमवारी सांगितले. २०१९ मध्ये चांद्रयान २ अपयशी ठरल्यानंतर चंद्रावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये अपयशी ठरलेल्या ‘चंद्रयान-२’चीच पुढील मोहीम म्हणून ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली होती. चांद्रयान २ वेळी पंतप्रधान मोदी बेंगळुरूला गेले होते. लँडरशी संपर्क तुटल्याचे अंतराळ संस्थेने जाहीर केल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान मोदींनी सिवन यांना मिठी मारली आणि त्यांचे सांत्वन केले होते. “चंद्राला स्पर्श करण्याचा आमचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे”, असा आशावादही मोदींनी दाखवला होता.
चांद्रयान-३ मोहीम १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील भारताच्या मुख्य अंतराळ बंदरातून प्रक्षेपित करण्यात आली. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि अलगद अवतरण, चंद्राचा अभ्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत. अवतरणापूर्वी विक्रम मॉड्युलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त अवतरण स्थळी सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण करण्यापूर्वी ५.४५ वाजता अवतरणाची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, असे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले.