‘काळानुरूप आपल्या दृष्टिकोनातही बदल करण्याची गरज असते आणि हे वारंवार सिद्धही झालेले आहे,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ या संघ प्रकाशनांचे वेगळ्या स्वरूपातील – वेगळ्या आकारातील पुनप्र्रकाशन सोमवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे अध्यक्ष विवेक गोएंकाही उपस्थित होते.
‘प्रवाहाविरोधात पोहण्याच्या तयारीसाठी संघाने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यातूनच खडतर काळातून कसा मार्ग काढायचा हे संघ शिकला आहे आणि लवकरच हा प्रवास आम्ही यशस्वीपणे पूर्णही करू,’ असा आत्मविश्वास सरसंघचालकांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी उपस्थितांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश होता. बदल हीच जगातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे. ती अटळ आहे. त्यामुळे काळानुरूप दृष्टिकोनात बदल करणे अनिवार्य ठरते. हे अवघड असले तरी अशा प्रसंगांमधून मार्ग काढत-काढतच आमची जडणघडण झाली आहे, असेही मोहन भागवत यांनी नमूद केले.
समाज एका विशिष्ट दिशेने आणि एकसंधपणे पुढे सरकण्याची गरज असते, त्यामुळे प्रत्येक आयामात बदलाची गरज अधोरेखित होत असते. त्यासाठी उत्तम संवादाची आवश्यकता असते. मात्र त्यात स्पष्टता आणि नेमकेपणा नसल्याने लोकांबाबत अपसमज निर्माण होतात, असे विश्लेषणही मोहन भागवत यांनी केले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात पांचजन्य आणि ऑर्गनायझर या अंकाकडे लोक सत्य जगापुढे मांडणारी प्रकाशने म्हणून पाहत होते, अशा शब्दांत त्यांनी या नियतकालिकांचा गौरव केला.
एक प्रकाशक म्हणून आपण कायमच ‘मजकुराची सत्याशी असलेली बांधीलकी’ आणि ‘बातम्यांची शुद्धता’ यालाच प्राधान्य देत आलो आहोत, असे या समारंभाचे प्रमुख पाहुणे असलेल्या विवेक गोएंका यांनी सांगितले. लोकांना कदाचित माहीत नसेल पण सुमारे ४० वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत असताना ऑर्गनायझर या नियतकालिकाची कायमस्वरूपी वर्गणी आपण भरली होती, अशी आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. आजवर एक अदृश्य प्रकाशक राहण्यातच मला आनंद मिळत आला. मात्र मी आपल्या आमंत्रणावरून इथे आलो, कारण या प्रकाशनांच्या माध्यमातून तुमचे आणि आमच्या इंडियन एक्स्प्रेस समूहाच्या प्रकाशनांचे उद्दिष्ट सत्य जगापुढे आणणे हेच आहे, असेही गोएंका यांनी आवर्जून नमूद केले. ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ या दोन्ही प्रकाशनांमधील विचारांनी अनेक संस्थांना प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांत विवेक गोएंका यांनी या नियतकालिकांचा गौरव केला.
‘डिजिटल माध्यमे’ प्रकाशनांना त्यांच्या भौगोलिक आणि विचारधारांच्या सीमारेषांपलीकडे नेत संवादाची दारे खुली करतात, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांमधील बदलांचे विश्लेषण केले.
बदल हे चिरंतन सत्य – मोहन भागवत
‘काळानुरूप आपल्या दृष्टिकोनातही बदल करण्याची गरज असते आणि हे वारंवार सिद्धही झालेले आहे,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-03-2014 at 06:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change is necessary rss chief mohan bhagwat