अचानक एखादे काम आले, गावी जायचे आहे.. मात्र सव्‍‌र्हर डाऊन असल्याने तत्काळ तिकीटच मिळाले नाही! असा अनुभव अनेक वेळा येतो. रेल्वेने आता यावर पर्यायी मार्ग शोधला आहे. तत्काळ तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर व तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी रेल्वे खात्याने आरक्षणाच्या वेळाच बदलल्या आहेत. तसेच तिकीट रद्द करणाऱ्यांना ५० टक्के परतावाही मिळणार आहे.
 वातानुकूलित डब्यांच्या तत्काळ आरक्षणासाठी सकाळी १० ते ११ ही वेळ दिली आहे. तर स्लीपर व इतरसाठी सकाळी ११ नंतर तत्काळ आरक्षण करावे लागणार आहे. ही नवीन वेळ १५ जूनपासूनच सर्वत्र अमलात आणण्यात येणार आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर येणारा ताण कमी होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मे महिन्यामध्ये दिवसाला तीन कोटी लोकांची तिकीट आरक्षणासाठी गर्दी होत होती. यामुळे सव्‍‌र्हर डाऊन होत होता.
विशेष म्हणजे आता रेल्वेने तिकीट काढण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व दलालांनाही तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या अध्र्या तासात तिकिटे आरक्षित करता येणार नाहीत. म्हणजे सर्वसामान्य तिकीट आरक्षणासाठी सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत आणि तत्काळसाठी वातानुकूलित तिकिटांसाठी १० ते १०.३० व इतर तिकिटांसाठी ११ ते ११.३० या वेळेत दलालांना तिकीट आरक्षण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटे काढणे अधिक सुलभ होणार आहे. आतापर्यंत आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या दहा मिनिटांतच आरक्षण फुल्ल होऊन प्रतीक्षा यादी ओसंडून वाहणे सुरू होत होते. या निमित्ताने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
तसेच तत्काळ तिकीट रद्द केल्यास वेळेप्रमाणे पन्नास टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची सोय करण्यात आली आहे. यापूर्वी तत्काळ तिकीट रद्द केल्यास त्याचे पैसे परत मिळत नव्हते. याचबरोबर त्या मार्गावरील ठरावीक काळातील गर्दी पाहून ‘सुविधा’ या विशेष रेल्वेची सोय करण्यात येणार आहे. मात्र याच्या तिकिटांचा दर जास्त असणार आहे. या रेल्वेचे आरक्षण ६० दिवसांपासून गाडी सुटण्याच्या १० दिवस आधी करण्यात येणार आहे.
रेल्वेतील साखळ्या काढण्यावर घूमजाव
चेन ओढून रेल्वे थांबवण्याची व्यवस्था बंद केली जाणार नसून केवळ त्याच्या गैरवापराबाबत जनजागृती केली जाईल, असे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्याच काही अधिकाऱ्यांनी रेल्वे गाडय़ांमधील चेन काढून टाकणार असल्याची माहिती दिली होती. या साखळ्या काढून टाकण्याचे काम बरेली येथील रेल्वे निगा केंद्रात सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. रेल्वे प्रवक्त्याने आज सांगितले की, रेल्वेच्या साखळ्या ओढून ती थांबवण्याचे गैरप्रकार होत असले तरी  साखळ्या काढण्याचा विचार नाही. रेल्वेच्या साखळ्या ओढून ती थांबवण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात मोठय़ा प्रमाणावर चालतात व गाडय़ा वेळेत न पोहोचल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.

Story img Loader