नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार तसेच अन्य जागतिक यंत्रणांच्या कामकाजात बदलत्या काळानुसार सुधारणा करण्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जी-२०’ समूहाच्या शिखर परिषदेच्या समारोपात केले. तर भारताच्या अध्यक्षतेखाली झालेली ही परिषद यशस्वी झाल्याची प्रशंसा अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी देशांनी केली. ‘जी-२०’चे यजमानपद वर्षभर यशस्वीपणे हाताळल्यानंतर, रविवारी दिल्लीतील दोन दिवसांच्या शिखर परिषदेची सांगता झाली. ‘स्वस्ति अस्तु विश्व’ असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी ‘जी-२०’चा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझीलचे अध्यक्ष लुइज़्ा इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सुपूर्द केली.
मोदी म्हणाले ‘‘५१ सदस्यांसह संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली तेव्हा जग वेगळे होते आणि आता सदस्य देशांची संख्या सुमारे २००वर गेली आहे. असे असूनही, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) स्थायी सदस्यांची संख्या अजूनही तेवढीच आहे. जग प्रत्येक बाबतीत खूपच बदलले आहे. त्यामुळे आता ‘यूएनएससी’तही बदलाची गरज आहे. कारण जे बदलत नाहीत त्यांची योग्यता कालांतराने नष्ट होते, हे निसर्गाचे तत्त्व आहे.’’ जागतिक संस्थांच्या कामकाजात जगातल्या नव्या वास्तवांचे प्रतिबिंब पडणे आवश्यक असल्याचे सांगून मोदी म्हणाले, जगाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी जागतिक संस्थांनी एकत्र काम करण्याबरोबरच आजचे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.
भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या सूत्रातून मांडलेला शाश्वत विकासाचा कार्यक्रम यापुढेही राहील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी शिखर परिषदेच्या निरोपाच्या भाषणात व्यक्त केली. दिल्ली घोषणापत्रामध्ये ‘हा काळ युद्धाचा नाही’, असे ठामपणे नमूद करण्यात आले आहे. हाच धागा पकडत मोदींनी, जगभरात शांतता लाभो (स्वस्ति अस्तु विश्व) अशी मनोकामना व्यक्त केली. ‘जी-२०’ समूहाचे अध्यक्षपद नोव्हेंबपर्यंत असल्याने आणखी दोन महिने भारत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेल असे सांगत, नोव्हेंबरमध्ये समूहाची दूरदृश्य प्रणालीद्वारे परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव मोदींनी अखेरच्या सत्रात मांडला. दिल्लीतील शिखर परिषदेमध्ये चर्चा झालेल्या मुद्दय़ांचा आढावा त्या परिषदेत घेता येईल, असे मोदी म्हणाले. गेल्या दोन दिवसांमध्ये आपण सर्वानी अनेक उपयुक्त सूचना केल्या असून महत्त्वपूर्ण प्रस्तावही मांडले आहेत. इथे मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी किती झाली याचा आढावा घेता येईल, असे मोदी यांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्रांच्या विस्ताराची आवश्यकता : लुइज
आरोग्यसेवा, शिक्षण, अन्नधान्य आदींचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. उत्पन्नातील असमानता कमी झाली पाहिजे, स्त्री-पुरुष समानतेवर अधिक भर दिला पाहिजे. विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उपाययोजना करू शकलो तर जागतिक समस्यांवर मात करता येईल, असे मत ब्राझिलचे अध्यक्ष लुइज़्ा इन्सियो लुला दा सिल्वा यांनी ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांचा विस्तार करण्याची गरज असून विकसनशील देशांना कायमस्वरुपी सदस्यत्व बहाल केले पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली.
उपासमार-गरिबीविरोधात ब्राझीलचा कार्यक्रम
भारताकडून ‘जी-२०’ समूहाचे यजमानपद आमच्याकडे आले आहे. भारतातील आमच्या बंधू-भगिनींनी वर्षभर केलेल्या कार्याचे आम्ही अनुकरण करण्याचा प्रयत्न करू, असे ब्राझिलचे अध्यक्ष लुईज़्ा इन्सियो लुला दा सिल्वा म्हणाले. न्याय आणि शाश्वत जगाची उभारणी हे ‘जी-२०’ समूहासाठी ब्राझिलचे ब्रिदवाक्य असेल. उपासमार आणि गरिबीविरोधात तसेच, हवामान बदलाच्या मुद्यावर जागतिक सहकार्य निर्माण करणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे असतील असे लुईज म्हणाले. भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ या सूत्रातून एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य या महत्त्वाच्या विषयाचा पाठपुरावा केला. या सूत्रामध्ये उपासमारीविरोधातील लढाई, पारंपरिक उर्जेकडून अपारंपरिक उर्जेकडे होणारी वाटचाल, सामाजिक समरसता, शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रशासनातील सुधारणा अशा महत्त्वाच्या मुद्यांचा भारताने समावेश केला. जगासाठी महत्त्वाच्या या सर्व मुद्दय़ांना ब्राझिल ‘जी-२०’च्या यजमानपदाच्या काळात पुढे घेऊन जाईल, असा विश्वास लुइज यांनी व्यक्त केला.
गांधीजींना अभिवादनावेळी ब्राझिलचे अध्यक्ष सद्गदीत
राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन करताना अत्यंत भावनिक झालो होतो, असे सांगताना ब्राझिलचे अध्यक्ष लुइज़्ा इन्सियो लुला दा सिल्वा सद्गदित झाले होते. शिखर परिषदेच्या अखेरच्या सत्रामध्ये ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लुइज़्ा यांनी भारताचे आभार मानले. गांधीजींना आदराजंली वाहिल्यानंतर मी अतिशय भावनिक झालो. माझ्या राजकीय आयुष्यात महात्मा गांधींना किती महत्त्व आहे हे अनेकांना कदाचित माहिती असेल. अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करण्याचे बळ गांधीजींनी आम्हाला दिले आहे. मी कामगार चळवळीत अनेक दशके सक्रिय असल्यापासून गांधीजी हेच आदर्श होते. राजघाटावर मला गांधीजींना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे, असे लुइज म्हणाले.
भारतमंडलममध्ये पावसाचे विघ्न
दिल्लीत रविवारी सकाळपासून पावसाने विघ्न आणले असले तरी, शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी सर्व राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर परिषदेच्या ‘एक भविष्य’ या तिसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रप्रमुख सहभागी झाले. पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या भारतमंडपमध्ये पाणी साचले होते. पण, काही तासांमध्ये पाऊस थांबला आणि व्यवस्थापकांनी पाण्याचा उपसा केल्याने भारतमंडपममधील सर्वाचा वावर सहज झाला.
विकासावर १०० टक्के सहमती
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा उल्लेख टाळत भारताने नवी दिल्ली जाहीरनाम्यात विकासाचे मुद्दे आणि भू-राजकीय प्रश्नांवर १०० टक्के सहमती मिळवली आणि सर्व देशांना एकमेकांच्या प्रादेशिक एकात्मतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले, असा दावा सूत्रांनी केला.
जगाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी जागतिक यंत्रणांनी आजचे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. जग प्रत्येक बाबतीत खूपच बदलले आहे. त्यामुळे ‘यूएनएससी’तही बदलाची गरज आहे. कारण जे बदलत नाहीत त्यांची कालयोग्यता कालांतराने नष्ट होते.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हवामान बदलाचे संकट आणि संघर्षांच्या तीव्र धक्क्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्था त्रस्त असताना ‘जी-२०’ समूह सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधू शकतो, हे यंदाच्या शिखर परिषदेने सिद्ध केले आहे. – जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका