विविध घोषणा, जातीय समीकरणाद्वारे विरोधकांना शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने अखेर राज्यात खांदेपालट करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. चरणजितसिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले.
राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ. पी. सैनी या दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी उपस्थित होते.
नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत विविध घोषणा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकानुनयी राजकारणाचे संकेत दिले. लहान घरांसाठी मोफत पाणीपुरवठा, वीजदरात कपात अशा घोषणा चन्नी यांनी केल्या. तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. चन्नी यांनी नव्या सरकारच्या धोरणांबाबत अधिक तपशील दिले नाहीत. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्य विरोधक असलेल्या आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या सवलतींच्या पाश्र्र्वाभूमीवर त्यांनी ही आश्वाासने दिल्याचे मानले जाते.
शहरी भागात छोट्या घरांना जल व स्वच्छता कर आकारला जाणार नाही. आपले सरकार वीजदरही कमी करेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. आपण ‘आम आदमी’ व गरीब व्यक्ती असल्याचे सांगताना चन्नी यांनी पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली.
चन्नी यांच्या सरकारमध्ये सुर्खंजदर रंधावा व ओ. पी. सोनी हे दोन उपमुख्यमंत्री असतील. पंजाबमध्ये पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले असून जाट-हिंदू समाजाला प्रतिनिधित्व देऊन जातीचे संतुलनही साधण्यात आले आहे. या तिघांनी पंजाबीत शपथ घेतली. हे तिघेही शनिवारी राजीनामा दिलेले अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात होते. रविवारी बऱ्याच विचारविनिमयानंतर चन्नी यांची विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड करण्यात आली.
मोदींकडून अभिनंदन
चन्नी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. जनतेच्या कल्याणासाठी पंजाब सरकारबरोबर केंद्र सरकार यापुढेही काम करेल, असे ट्वीट मोदी यांनी केले.
चन्नी यांच्या राजीनाम्याची महिला आयोगाची मागणी
नवी दिल्ली : ‘मी टू’ प्रकरणातील आरोपामुळे पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्या वाट्याला आलेला अनुभव इतर महिलांच्या वाट्याला येऊ नयेत आणि त्यांना तसा छळ सोसावा लागू नये, यासाठी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा’, असे शर्मा यांनी म्हटले आहे.