पूंछमध्ये हवाई दलाच्या गाडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे. याच विधानाबाबत आता चन्नी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट लिहून त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
काय घडलं होतं?
दहशतवाद्यांकडून भारतीय वायुसेनेच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील सनई गावात ही घटना घडली होती. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती.
चन्नी यांची प्रतिक्रिया काय होती?
चरणजीत सिंग चन्नी यांनी या घटनेवर भाष्य करताना म्हटले होते की, “केंद्रातील भाजपा सरकार अशा दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांचा फायदा घेते. हे दहशतवादी हल्ले नाहीत तर निवडणुकांच्या तोंडावर निवडणुका जिंकण्यासाठी केलेला स्टंट आहे. भाजपा लोकांच्या जिवाशी खेळ करत आहे.”
भाजपाची टीका
या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपाच्या नेत्यांनी चन्नी यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना धारेवर धरलं होतं. भाजपासह काँग्रसच्याही काही नेत्यांनी चरणजीत सिंग चन्नी यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर चन्नी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चन्नी यांच्या स्पष्टीकरणात काय?
या विवादित वक्तव्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ते म्हणाले, “पूंछ जिल्ह्यातील घटनेसंबंधी माझं वक्तव्य मी वर्तमानपत्रात वाचलं. मी त्यामध्ये इतकंच म्हणालो होतो की अशा घटनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो. मी फक्त सत्ताधारी पक्षाची मानसिकता तशी असल्याचं माझ्या वक्तव्यात म्हणालो. माझी देशाच्या सैनिकांबद्दल आदराची भावना आहे”.
चन्नी या पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “जवानांच्या त्यागापुढे, हौतात्म्यापुढे मी नेहमीच नतमतस्तक होतो. देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक असल्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगतो. दहशतवाद्यांकडून भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला. त्यात आपला एक जवान शहीद झाला. मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”