पीटीआय, पणजी : हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला पोलिसांनी नमूद केले होते, मात्र त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गोवा पोलिसांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानुसार फोगट यांच्या मृतदेहाचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्याचा अहवाल गुरुवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार पोलिसांनी सुधीर सागवान आणि सुखिवदर वासी या दोघांवार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगट २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या, त्या वेळी हे दोघेही त्यांच्यासोबत होते. फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी या दोघांविरोधात अंजुना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.