दोषी आढळल्यास आजन्म कारावास शक्य
रायसिन या अत्यंत विषारी पदार्थाचा वापर करून अध्यक्ष बराक ओबामा यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप येथील एका व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. जेम्स डुट्शक (४१) असे त्याचे नाव असून तो मूळचा मिसिसिपी येथील आहे. दोषी आढळल्यास त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.
ओबामा यांच्यासह सिनेटर रॉजर विकर आणि ली काऊंटी न्यायालयाचे न्यायाधीश सॅडी होलांद यांना ८ एप्रिल रोजी डुट्शकने रायसिन लावलेले पत्र पाठवले होते. मात्र, व्हाइट हाऊसमधील तज्ज्ञांना आधीच या पत्राचा सुगावा लागल्याने त्यांनी पत्र जप्त केले. त्यानंतर डुट्शकला मिसिसिपीतून २७ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर येथील न्यायालयात खटला सुरू होता. विषारी जैविक अस्त्र तयार करण्याबरोबरच ते बाळगणे, त्याचा साठा करणे, त्याचा विघातक पद्धतीने वापर करणे तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी आरोप डुट्शकवर लावण्यात आले आहेत.
डुट्शकला उद्या, ६ जूनला मिसिसिपीतील ऑक्सफर्ड न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. डुट्शक दोषी आढळल्यास त्याला अडीच लाख डॉलरचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. डुट्शक ने मात्र त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा