कट्टर डाव्या विचारांची कास धरून धर्माधतेविरोधात वसा घेतल्याचा दावा करणाऱ्या पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाच्या कार्यालयात बुधवारी तीन अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्यात या साप्ताहिकातील १२ पत्रकार आणि कर्मचारी ठार झाले. या हल्ल्यात दोन पोलीसही मृत्युमुखी पडले असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. फ्रान्समधील हा चार दशकांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून त्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने स्वीकारलेली नाही.
चेहरा झाकलेल्या दोन अतिरेक्यांनी प्रेषित महम्मद यांच्या अपमानाचा बदला घेण्याच्या घोषणा देत हा हल्ला चढविला. त्यांच्याकडे कॅलाश्निकॉव्ह बनावटीच्या बंदुका आणि अग्निबाण प्रक्षेपक होते. हल्ल्यानंतर त्यांनी एक मोटार बळकावली आणि त्यातून भरधाव वेगाने ते पसार झाले. यावेळी एक पादचारी त्यांच्या गाडीखाली येऊन मृत्युमुखी पडला तर काही पादचाऱ्यांवर त्यांनी गोळीबारही केला.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोस हॉलंड यांनी तात्काळ या साप्ताहिकाच्या कार्यालयास भेट दिली. वृत्तपत्रावर अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच हा नृशंस हल्ला आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही घेतली. संपूर्ण पॅरिसमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली आहे.
या हल्ल्यात मुख्य कार्यकारी संपादक स्टीफन शाबरेनार, व्यंग्यचित्रकार कॅबु, टिग्नाउस आणि वोलिन्स्की मृत्युमुखी पडले आहेत.
अरब लीग व सुन्नी इस्लामींच्या प्रतिष्ठित अशा अल्-अजहर या धर्मपीठाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या साप्ताहिकाने मुस्लिमांच्या भावना वारंवार दुखावल्या असल्या तरी इस्लामला हिंसाचार अमान्य आहे, त्यामुळेच या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही, असे अल्-अजहरने म्हटले आहे.

वादांची परंपरा
डेन्मार्कच्या वृत्तपत्रात प्रथम प्रसिद्ध झालेली आणि जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास कारणीभूत ठरलेली प्रेषित महम्मद यांची व्यंगचित्रे ‘शार्ली एब्दो’ने ९ फेब्रुवारी २००६च्या अंकात प्रकाशित केली. त्यानंतर हे साप्ताहिक इस्लामी दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत आले. ३ नोव्हेंबर २०११चा विशेषांक ‘शरिया एब्दो’ नावे प्रसिद्ध करण्याची आणि त्याचे अतिथी संपादक स्वत: प्रेषितच असल्याची जाहिरात या साप्ताहिकाने दिली तेव्हाही अशीच खळबळ उडाली. हा अंक प्रकाशित होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे २ नोव्हेंबर २०११ रोजीच या साप्ताहिकाच्या कार्यालयात पहाटे स्फोट घडविले गेले आणि त्यांचे संकेतस्थळही रोखण्यात आले होते. सप्टेंबर २०१२मध्ये या साप्ताहिकाने पुन्हा प्रेषितांची व्यंगचित्रे प्रकाशित केली होती.

फ्रान्समधील याआधीचे हल्ले
२० मे १९७८
पॅरिसच्या दक्षिणेकडील ऑर्ली विमानतळावर पॅलेस्टिनी अतिरेक्याकडून गोळीबार. चकमक व कारवाईत तीन अतिरेक्यांचा खात्मा तर दोन पोलीस आणि तीन प्रवासी मृत्युमुखी.
३ ऑक्टोबर १९८०
पॅरिसमधील सिनेगॉगसमोर स्फोट. ४ ठार, २० जखमी.
२९ मार्च १९८२
पॅरिसकडे येणाऱ्या रेल्वेगाडीवर हल्ला. ५ ठार, ७७ जखमी. कुख्यात अतिरेकी कालरेस हा सूत्रधार असल्याचा संशय.
९ ऑगस्ट १९८२
पॅरिसमधील ज्यूंची वस्ती असलेल्या भागांतील गोल्डनबर्ग रेस्टॉरन्टवर पाचजणांनी केलेल्या गोळीबार व हातबॉम्बफेकीत ६ ठार, २२ जखमी.
१५ जुलै १९८३
ऑर्ली विमानतळावर तुर्किश हवाईसेवेच्या काउंटरवर स्फोट. ८ ठार, ५४ जखमी. मार्च १९८५मध्ये या हल्ल्यावरून तीन अमेरिकी नागरिक दोषी म्हणून जाहीर.
३१ डिसेंबर १९८३
मार्सेलिस येथील सेंट चार्ल्स रेल्वेस्थानकात तसेच मार्सेलिसकडे येत असलेल्या गाडीत स्फोट. एकूण पाच प्रवासी ठार तर ३४ जखमी.
१७ सप्टेंबर १९८६
पॅरिसमधील व्यापारी संकुलात स्फोट. ७ ठार, ५५ जखमी.
२५ जुलै १९९५
पॅरिसच्या सेंट मायकल मेट्रो स्थानकात बॉम्बस्फोटात ८ ठार, ११९ जखमी. असे नऊ हल्ले त्या वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी झाले. यातील तीन हल्ल्यांवरून २००२मध्ये दोन अतिरेक्यांना जन्मठेप.
३ डिसेंबर १९९६
पुन्हा मेट्रो मार्गावरच स्फोट. यात ४ ठार, ९१ जखमी.
११ मार्च २०१२
महम्मद मेराह या २३ वर्षीय तरुणाने ११ मार्च आणि १५ मार्चला तीन सैनिकांची हत्या केली. १९ मार्चला तीन विद्यार्थी तसेच एका शिक्षकाला गोळीबारात ठार केले. २२ मार्चला त्याच्या घरावर छापा घातल्यानंतर झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

Story img Loader