‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकावर बुधवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लाप्रकरणी दोन अतिरेक्यांचा शोध अद्याप सुरू असताना आणि पॅरिसमधील बंदोबस्तात कमालीची वाढ झाली असताना पॅरिसच्या दक्षिण भागात एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस ठार झाली असून तिचा सहकारी जखमी झाला आहे. हा तरुण फरारी असून बुधवारच्या हल्ल्याशी या गोळीबाराचा संबंध आहे का, याची छाननी सुरू आहे. बुधवारच्या हल्ल्यावरून काही बातम्यांत नाव आल्याने मुराद हमीद (१८) हा तरुण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याचा या हल्ल्याशी वा हल्लेखोरांशी काही संबंध आहे का, हेदेखील अद्याप उघड झालेले नाही. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळला जात असून वृत्तपत्रे, धार्मिक स्थळे व रेल्वेस्थानकांवर बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली आहे. बुधवारच्या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये तणावाचे वातावरण असून काही मशिदींवर हल्ले झाले आहेत.
बुधवारचा हल्ला चढविणारे अतिरेकी हे येमेनी अल कायदा संघटनेचे असल्याचा तर्क आहे. हल्ल्यानंतर पळ काढताना ‘प्रसिद्धी माध्यमांना सांगा की अल्-कायदा येमेनने हे घडविले आहे,’ असे एका अतिरेक्याने स्वत:च ओरडून सांगितल्याचे एका पादचाऱ्याने सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ‘शार्ली एब्दो’च्या कार्यालयात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारावरील यंत्रावर गोपनीय क्रमांक  टाकावा लागतो. या अतिरेक्यांनी मला आणि माझ्या मुलीला असे धमकावले की मला तो क्रमांक टाकून त्यांना आमच्याबरोबर प्रवेश करू द्यावा लागला, अशी कबुली कर्मचारी व चित्रकार कोरिन रे हिने दिली. अतिरेकी आत घुसताच आपण एका टेबलाखाली लपून जीव वाचवला, असे तिने सांगितले. अतिरेकी मोडकेतोडके फ्रेंच बोलत होते आणि ते संपादक शाबरेनेर यांचे नाव घेत त्यांच्या केबिनमध्ये घुसले. त्यांनी शाबरेनेर यांच्या अंगरक्षकाची आणि शाबरेनेर यांची प्रथम हत्या केली आणि नंतर कार्यालयात अंदाधुंद गोळीबार केला. शेरीफ आणि सईद कुरेशी या फ्रान्समधील दोघा भावांचा या हल्ल्यावरून शोध सुरू आहे. शेरीफ हा ३२ वर्षांचा असून दहशतवादी कृत्यांसाठी २००८मध्ये त्याला १८ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. या हल्ल्याशी या दोघांचा संबंध आहे का, याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी पॅरिस आणि लगतच्या उपनगरांमध्ये जोरदार शोधमोहीम सुरू  आहे.
शार्ली एब्दो सुरूच राहणार
निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतरही ‘शार्ली एब्दो’ सुरूच राहणार असल्याचा ठाम निश्चय व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील आठवडय़ात ‘शार्ली एब्दो’चा अंक बाजारात येईलच, असे कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी सांगण्यात आले.
‘शार्ली एब्दो’या व्यंगचित्र साप्ताहिकावरील दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद फ्रान्ससह जगभरात उमटले. फ्रान्समधील सर्व प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याचा निषेध करत ‘मी शार्ली’ असे शीर्षक असलेले फलक सर्वत्र झळकावले.

Story img Loader