ChatGPT Down Globally : ओपन एआय कंपनीचा चॅटबॉट चॅट जीपीटी (ChatGPT) वापरताना भारत आणि जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वापरकर्त्यांना हा प्लॅटफॉर्म वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.
अनेक वापरकर्त्यांनी चॅट जीपीटी वेबसाईट वापरताना त्यांना ‘एरर ५०३ : सेवा काही काळासाधी उपलब्ध नाही’ (Error 503: Service Temporarily Unavailable)असा एरर दाखवत असल्याचे म्हटले आहे.
जगभरातील वेबसाईट्स संबंधी आऊटेज मॉनिटर करणाऱ्या डाऊन डिटेक्टर (Downdetector) सर्व्हिसने देखील या वेबसाईटला १००० हून अधिक वापरकर्त्यांनी रिपोर्ट केल्याचे नमूद केले आहे. यामुळे जीपीटी-४ आणि त्याचा लहान प्रकार जीपीटी-४ मिनी दोन्ही डाऊन झाल्याचे दिसून येत आहे.
ओपन एआय कंपनीच्या अधिकृत स्टेटस पेजनुसार सध्या चॅट जीपीटी आणि एपीआय या दोन्हीच्या वापरादरम्यान अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या पेजवर नेहमीपेक्षा जास्त एरर येत आहेत. दरम्यान ओपन एआय आणि एपीआयकडून तांत्रिक अडचण सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहे.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी ओपन एआय सध्या सेवा ठप्प होण्यामागील कारणांचा तपास करत आहे. तसेच एकाच वेळी जगभरात सेवा ठप्प होण्यामागील नेमके कारण काय? याबद्दल अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
डिसेंबरपासून तिसऱ्यांदा चॅट जीपीटी ठप्प
चॅटजीपीटी डाऊन होण्याची ही डिसेंबर महिन्यापासून तिसरी वेळ आहे. यापूर्वी दोन वेळा तांत्रिक अडचणींमुळे त्याच महिन्यात दोनदा सेवा ठप्प झाली होती. दरम्यान चॅट जीपीटीचा चॅटबॉटची सेवा ठप्प झाल्यानंतर अनेक वापरकर्ते सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत आहेत.
तसेच कामाच्या मध्येच हा बिघाड झाल्याने खोळंबा झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. तर अनेक वापरकर्ते मजेशीर मीम्स देखील शेअर करत आहेत.