नवी दिल्ली: हरियाणातील प्रभावी जाट नेते चौधरी बीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र व हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह यांनीही काँग्रेसचा हात पकडला होता. गेल्या काही महिन्यांतील वेगवान राजकीय घडामोडींमुळे लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपची बिगरजाट व विरोधकांची जाट परस्परविरोधी लढाई तीव्र होऊ लागली आहे.
बीरेंद्र सिंह ४३ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेत भाजपमध्ये गेले होते. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बीरेंद्र यांनी कमळ हाती घेतले होते. काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपमध्ये आल्यामुळे त्यांना राज्यसभेची खासदारकी आणि राज्यमंत्रीपदही मिळाले होते. २०१९ मध्ये त्यांचे पुत्र बृजेंद्र सिंह यांना हिसारमधून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपची भिस्त जाटांपेक्षा बिगरजाट समूहांवर वाढू लागली होती. उलट, भाजपविरोधी शेतकरी तसेच, महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनांना जाट समाजाने पािठबा दिला होता. सिंह पिता-पुत्रांनी राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना विरोध केला होता.
हेही वाचा >>>इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
हरियाणामध्ये लोकसभेनंतर पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपने त्याची तयारी सुरू केली असून मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला आहे. ओबीसी समाजातील नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले आहे. दुष्यंत चौधरी यांच्या जाटांचा प्रभाव असलेला जननायक जनता पक्षाशीही युती तोडण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जाट मते काँग्रेस, जननायक जनता पक्ष व लोकदल (आयएनएलडी) या तीन पक्षांमध्ये विभागली गेली तर बिगरजाट ध्रुवीकरणाचा लाभ भाजपला मिळू शकेल असे मानले जात आहे. भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील समीकरणांचा अंदाज घेऊन बीरेंद्र सिंह यांच्यासारख्या प्रभावी जाट नेत्याने घरवापसी केल्याचे सांगितले जाते.
हरियाणामध्ये लोकसभेच्या १० जागा
हरियाणामध्ये लोकसभेच्या १० जागा असून काँग्रेसने प्रामुख्याने जाट मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच हरियाणा काँग्रेसमधील भूपेंदर हुडा, रणदीप सुरजेवाला, कुमारी सेलजा असे बडे नेते मंगळवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बीरेंद्र सिंह यांच्या काँग्रेसप्रवेशासाठी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये जाण्यासाठी कोणाशी बोलावे असे मी विचार करत होतो तेव्हा माझा जयराम रमेश यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मला काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले. माझी केवळ घरवापसी नव्हे तर माझ्यासाठी विचारधारेचे पुनरागमन म्हणता येईल, असे मत बीरेंद्र सिंह यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केले.