तेरा वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात हरयाणाचे पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे सर्वेसर्वा ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे आमदारपुत्र अजय चौटाला यांच्यासह ५५ जणांना बुधवारी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. ओमप्रकाश चौटाला आणि पुत्र अजय चौटाला यांना तात्काळ अटक करून त्यांची २२ जानेवारीपर्यंत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. २२ तारखेला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. या खटल्याच्या निकालामुळे हरयाणात राजकीय भूकंप घडला असून चौटाला आणि त्यांच्या पक्षाच्या भवितव्यापुढे मोठेच प्रश्नचिन्ह लागले आहे.
दिवंगत माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र असलेले चौटाला यांना सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती विनोद कुमार यांनी दोषी ठरवून लगेच अटक करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी अटक करून त्यांची तिहार तुरुंगात रवानगी केली. दोषींना किती शिक्षा द्यायची यावर १७ जानेवारी रोजी युक्तिवाद होणार आहे. चौटाला यांना तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास घडण्याची शक्यता असून तसे झाल्यास २०१४ साली हरयाणातील लोकसभा व विधानसभा निवडणुका त्यांना लढविता येणार नाही. चौटाला पितापुत्रांविरुद्ध प्रचंड प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमविल्याच्या आरोपांवरूनही खटले सुरू आहेत.
३२०८ शिक्षकांची मनमानी भरती
हरयाणात १९९९-२००० मध्ये ओमप्रकाश चौटाला यांची सत्ता असताना हा घोटाळा झाला होता. चौटाला पितापुत्रांनी सत्तेचा दुरुपयोग करीत मूळ गुणवत्ता यादी डावलून लाच घेऊन ३२०८ कनिष्ठ शिक्षकांची मनमानी पद्धतीने भरती केल्याचा आरोप होता. तत्कालिन प्राथमिक शिक्षण संचालक संजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांच्या यादीत फेरबदल करण्यासाठी चौटाला दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दोषींमध्ये संजीव कुमार यांचाही समावेश आहे. 

Story img Loader