मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना अभय देत नेतृत्वबदलाच्या बातम्या पसरवणाऱ्या नेत्यांना ‘समज’ दिली आहे. पक्षनेतृत्वाच्या सूचनेनंतर राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात लढवली जाणार असल्याची घोषणा केली व नेतृत्वबदलाच्या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना शह दिला आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याशी आज विस्ताराने चर्चा केली. त्यामध्ये जागावाटप, लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेल्या चुकांची माहिती त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली. लोकसभा निवडणुकीचा ‘अर्थ’ न उमगल्याने काही नेते मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर दबाव टाकत होते. पराभवाचे अतिरिक्त ‘अर्थ’पूर्ण विश्लेषण करण्याची ‘मागणी’ काँग्रेसचे अनेक पराभूत नेते मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने करीत होते. मागणी पूर्ण न झाल्याने याच नाराज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याच्या कंडय़ा पिकवल्या. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची व्यथा मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली. याची गंभीर दखल हायकमांडने घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांची उचलबांगडी टळली असली तरी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर अद्याप टांगती तलवार कायम असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.
निवडणूक प्रचार समिती स्थापणार
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीची स्थापना करण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावांची चर्चा असल्याचे सूत्रांकडून समजते. प्रदेशाध्यक्षपदासाठी सामाजिक न्याय व कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे व राज्यसभा सदस्या रजनी पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. रजनी पाटील यांनी अलीकडेच सोनिया गांधी यांची भेट घेऊन कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास विलंब न करण्याची विनंती केली होती.
राष्ट्रवादीच्या दबावतंत्रावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्राला बळी न पडण्यासाठीे डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे. वाढीव जागा मागणाऱ्या राष्ट्रवादीने आत्तापासूनच स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटप करून उमेदवारांची घोषणा करावी, अशी विनंती चव्हाण यांनी राहुल गांधी यांना आजच्या भेटीत केली.
..आणि राज्य काँग्रेसमधील संभ्रम दूर झाला
मुख्यमंत्री जाणार, राहणार याबाबतची अनिश्चितता, पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेण्यास लावण्यात येणारा विलंब यामुळे विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली तरी काँग्रेसच्या आघाडीवर सारेच गोंधळाचे वातावरण होते. पुढील निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, असे केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केल्याने राज्य काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संभ्रम तरी दूर होण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आणि नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली. जवळपास गेली पावणे दोन महिने मुख्यमंत्री राहणार की जाणार याबाबतच संभ्रम होता. दिल्लीनेही थांबा आणि वाट बघा, अशी भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण होते. आगामी निवडणूक ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखील लढली जाईल, असे पक्षाने जाहीर केल्याने काँग्रेसमधील अस्थिरता दूर झाली. मुख्यमंत्र्यांबरोबरच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही कायम ठेवले जाईल, अशी चिन्हे आहेत. मात्र, ठाकरे यांच्याऐवजी नवा अध्यक्ष नेमला जावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत मांडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा