Cash For Question मुळे चर्चेत असलेल्या तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये शशी थरुर आणि महुआ मोईत्रा पार्टी करताना दिसत आहेत. तसंच मद्यपान आणि धूम्रपानही करताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारावर शशी थरुर यांनी संताप व्यक्त केला आहे. महुआ मोईत्रा आणि शशी थरुर यांचे हे फोटो X वर व्हायरल झाले आहेत. ज्यानंतर हे अत्यंत घाणेरडं राजकारण असल्याचं थरुर यांनी म्हटलं आहे.
शशी थरुर काय म्हणाले?
“माझे आणि महुआ मोईत्राचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. हे व्हायरल करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे करत आहात ते सगळं अत्यंत हलक्या पातळीचं आहे. जे फोटो व्हायरल केले जात आहेत ते महुआ मोईत्रांच्या वाढदिवसाचे आहेत. त्यादिवशी त्यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. या फोटोंशी छेडछाड करुन ते प्रायव्हेट असल्याचा, सिक्रेट मिटिंग असल्याचा आभास निर्माण केला जातो आहे. ही बाब अत्यंत हीन पातळीची आहे.
हे पण वाचा “Mahua Moitra : ‘कॅश फॉर क्वेश्चन’ मुळे चर्चेत आलेल्या महुआ मोईत्रा कोण आहेत?
केरळमधल्या कोट्टायम या ठिकाणी शशी थरुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना महुआ मोईत्रांबरोबर जे फोटो व्हायरल झालेत त्याविषयी विचारलं असता हे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे. महुआ मोईत्रा या माझ्यापेक्षा १०-२० वर्षांनी लहान आहेत. मला त्या मुलीप्रमाणे आहेत. तरीही इतकं खालच्या पातळीचं राजकारण केलं जातं आहे. असं म्हणत शशी थरुर यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
काही लोकांनी जाणीवपूर्वक इतर लोकांना या फोटोंमधून हटवलं आणि हे फोटो आमच्या सिक्रेट पार्टीचे आहेत असं भासवण्याचा प्रयत्न केला. ज्यांना हे वाटतंय त्यांनी फक्त हे फोटो कुणी काढले असावेत याचा विचार करावा असंही शशी थरुर म्हणाले आहेत. तसंच मी लोकांची कामं करण्यावर भर देतो असल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही असंही शशी थरुर म्हणाले आहेत.
काय आहे हे प्रकरण?
Rosy या X अकाऊंटवरुन शशी थरुर आणि महुआ मोईत्रा यांचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. जे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन शशी थरुर आणि महुआ मोईत्रा पार्टी करत असल्याचं दिसतं आहे. तसंच एका फोटोत महुआ मोईत्रा सिगार ओढत असल्याचंही दिसतं आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत शशी थरुर यांना विचारलं असता त्यांनी मात्र हे सगळं हीन पातळीवरचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे.