अ‍ॅपलचा स्मार्टफोन हवा आहे, अशी ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला हा व्यवहार भलताच महागात पडल्याचा प्रकार ऑस्ट्रेलियात उघडकीस आला आहे. या तरुणीला एका महिलेने स्मार्टफोनऐवजी खोक्यातून चक्क दोन खाण्याची सफरचंद देऊन बाराशे डॉलरचा गंडा घातला.
फसवणूक झालेल्या तरुणीने येथील गमट्री या संकेतस्थळावर आपल्याला दोन अ‍ॅपलचे स्मार्टफोन खरेदी करायचे असल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीला एका महिलेने प्रतिसाद दिला आणि आपल्याकडे दोन सफरचंदे विकायची असल्याचे सांगितले. खरेदी विक्रीचा व्यवहार निश्चित झाल्यानंतर दोघीजणी एका मॅकडॉनाल्डच्या दुकानात भेटल्या. तिथे तरुणीने ठरल्याप्रमाणे दोन स्मार्टफोनचे पैसे आरोपी महिलेला दिले आणि त्या महिलेने स्मार्टफोनचे दोन नवे कोरे खोके दिले. मात्र त्या तरुणीने ते खोके न तपासताच घर गाठले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले असता त्यामध्ये चक्क खाण्याची सफरचंदे आढळून आली.
या प्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संकेतस्थळाची प्रवक्ती निकी हेन्नेस्सी यांनी सांगितले की, आपली कंपनी ग्राहकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेत आहे. ऑनलाइन खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करीत असल्याचेही सांगितले.

Story img Loader