पीटीआय, नवी दिल्ली
‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये झालेल्या पेपरफुटीची व्याप्ती तपासण्यासाठी शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) दिले. २० जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत यासाठी देण्यात आली आहे. फेरपरीक्षेचे आदेश देण्यासाठी ठोस कारण आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मे महिन्यात घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप असून सर्वोच्च न्यालायलात ४०पेक्षा जास्त याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी एकत्रित सुनावणी घेताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. केंद्र आणि एनटीएची बाजू मांडणारे महान्यायवादी तुषार मेहता यांनी याला आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने आपला आदेश कायम ठेवला. फेरपरीक्षेचे आदेश द्यायचे असतील, तर त्यासाठी ठोस कारण लागेल. त्यामुळे पेपरफुटी काही शहरे आणि परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित आहे की त्याची व्याप्ती मोठी आहे, हे तपासणे आवश्यक असल्याचे न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>करोनानंतर जगाला कळले, भारताकडे शांतता, आनंदाचा मार्ग; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
‘नीट’मधील गैरव्यवहारांबाबत याचिकांवर गुरुवारी दिवसभर सुनावणी झाली. या प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावण्याच्या उद्देशाने खंडपीठाने नंतरच्या याचिका रद्द करून याच विषयावर सुनावणी सुरू ठेवली. यावेळी अनेक महत्त्वाची निरीक्षण नोंदविताना केंद्र सरकार आणि एनटीएला न्यायालयाने धारेवर धरले. झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या ४५ मिनिटे आधी पेपर फुटला आणि त्याची उत्तरे विकण्यात आल्याचा दावा एनटीएने केला आहे. या टोळीनेच बिहारला ही फुटलेली उत्तरे पाठविल्याचेही संस्थेचे म्हणणे आहे. या दाव्यावर सरन्यायाधीशांनी शंका उपस्थित केली. केवळ ४५ मिनिटांत सर्व १८० प्रश्नांची उत्तरे शोधून पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली गेली आणि त्यांनी ती पाठ करून उत्तरपत्रिका लिहिली, हे गृहीतक ओढूनताणून आणलेले वाटत असल्याचे तोंडी निरीक्षण न्या. चंद्रचूड यांनी नोंदविले. यावर ‘पेपर फोडणाऱ्या टोळीतील सात जणांनी प्रश्न वाटून घेतले व उत्तरे शोधली तसेच केवळ ४५ मिनिटे आधी पेपर फुटल्यामुळे तो विकत घेणाऱ्यांना चांगले गुण मिळू शकले नाहीत,’ असे उत्तर महान्यायवादी तुषार मेहता यांनी दिले. यात हस्तक्षेप करताना एका याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. संजय हेगडे यांनी पाटण्यामध्ये दाखल एफआयआरचा दाखला दिला. या अहवालात आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे उल्लेख असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सुनावणी स्थगित करण्यापूर्वी खंडपीठाने बिहार पोलिसांकडील तपशील सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पेपरफुटी ही पद्धतशीरपणे केली गेली आहे आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाल्याचे सिद्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.
पेपर कुठे फुटला?
●झारखंडच्या हजारीबागमध्ये नीटचा पेपर फुटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
●हा पेपर पाटण्याला पाठविला गेला, मात्र बिहारमध्ये पेपर फुटला नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
●पेपर आदल्या दिवशी फुटला व समाजमाध्यमांवर पाठविला गेल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
●गुजरातच्या गोध्रामध्ये केवळ ओएमआर उत्तरपत्रिकांमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका आहे.
एनटीएचा दावा
परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ ते ९.२० दरम्यान पेपरचे छायाचित्र घेतले गेले. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहिली गेली आणि टोळीला पैसे देणाऱ्यांना पाठ करण्यासाठी ही उत्तरे देण्यात आली.
न्यायालयाचा प्रश्न
१०.१५ वाजता परीक्षा सुरू झाली असेल, तर ४५ मिनिटांमध्ये १८० प्रश्नांची उत्तरे लिहिली गेली आणि विद्यार्थ्यांना दिली गेली, हे गृहीतक ओढूनताणून केले आहे, असे वाटते.