राग हा एखाद्या वादळासारखा असतो. रागामुळे केवळ नुकसानचं होतं. परंतु अनेकांना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. रागाच्या भरात अनेकजण अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तर अनेकदा रागामुळे मोठं आर्थिक नुकसान देखील भोगावं लागतं. तमिळनाडू राज्यातील चेन्नईमधील कांचीपुरममध्ये एका तरुण डॉक्टरला त्याच्याच रागाचा मोठा फटका बसला आहे. या डॉक्टरचं वय २८ वर्ष इतकं आहे. त्याने रागाच्या भरात त्याची मर्सिडीज कार पेटवली. या कारची किंमत तब्बल ५० लाख रुपये इतकी होती. या तरुणाने असं का केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपल्या प्रेयसीवरील रागामुळे त्याने असं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
या डॉक्टरचं गुरुवारी रात्री त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं होतं. त्याने पोलिसांना सांगितलं की, भांडणानंतर तो रात्री ९ वाजता त्याची कार एका मोकळ्या मैदानात घेऊन गेला आणि तिथे त्याने त्याची कार पेटवली. या कारची किंमत तब्बल ५० लाख रुपये इतकी होती. कविन असं या डॉक्टरचं नाव आहे. कविन गुरुवारी रात्री त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता. तिथे दोघांचं भांडण झालं. त्यानंतर त्याने तिला आपल्या कारमध्ये बसवलं. त्यानंतर दोघे कांचीपुरम जिल्ह्यातील राजाकुलममधील एका तलावाजवळ निर्जन स्थळी ठिकाणी गेले.
कार पूर्णपणे जळून खाक : पोलीस
पोलिसांनी सांगितलं की, तिथे या दोघांचं परत भांडण झालं होतं. त्यानंतर कविनने कारवर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. त्यानंतर तिथल्या लोकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर कांचीपुरम तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कविनला जामीनावर सोडून देण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, कार या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
कविन आणि काव्या एकाच मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी
पोलिसांनी सांगितलं की, धर्मपुरी परिसरात राहणाऱ्या कविनने गेल्या वर्षी कांचीपुरममधील एका खासगी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आता तो एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत आहे. त्याच कॉलेजमधून शिक्षण घेणारी काव्या त्याची गर्लफ्रेंड आहे. २८ वर्षीय काव्या एका खासगी दवाखान्यात काम करते.