बुद्धिबळाच्या पटावरील राजा अशी ख्याती असणाऱ्या विश्वनाथन आनंदने आपण किती मोठ्या मनाचे आहोत हे दाखवून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे चेन्नई शहरात जनजीवन विस्कळीत झाले होते. या पुरामुळे अनेकांना आपल्या घरादाराला मुकावे लागले होते. हीच गोष्ट ध्यानात घेऊन विश्वनाथन आनंदने त्याच्या चेन्नईतील घराचे दरवाजे पूरग्रस्तांसाठी खुले केले. आनंदच्या या घरात जवळच्याच झोपडपट्टीतील २० पूरग्रस्तांनी आसरा घेतला होता. माझ्या लहान मुलाला आणि सासऱ्यांना घरात ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बाहेर पडणे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळेच आम्ही पूरग्रस्तांना आसरा द्यायचे ठरवले, असे आनंदची पत्नी अरूणाने सांगितले. चेन्नईत पहिला पूर आल्यानंतर आम्ही जवळच्याच एका झोपडपट्टीतील २० जणांना आमच्या घरात जागा दिली. यामध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश होता. अरूणाकडून घरामध्ये या सगळ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय, काही जेवण स्वयंसेवकांद्वारे बाहेर पुरात अडकलेल्यांसाठीही पाठविण्यात येत होते, असे अरूणाने सांगितले.

Story img Loader