चेन्नईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून चाललेल्या एका पादचाऱ्याला समोरून आलेल्या कारनं धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी ( २७ सप्टेंबर ) दुपारी किलपॉक परिसरात ही घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पलानी असं मृत्यू झालेल्या, तर जयकुमार असं कार चालकाचं नाव आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पलानी रस्त्यावरून चालत जात होते. तेव्हाच, समोरून येत असलेल्या जयकुमार यांच्या कारनं पलानींना समोरून जोरदार धडक दिली. यात पलानी हवेत उडून खाली पडले आणि कार पुढील तीनगाड्यांना धडकली. धडक एवढी जोरदार होती की पलानी यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर पोलिसांनी कारचालक जयकुमारवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याप्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.