Chennai Singham for IPL 2025 Matches: गेल्या महिन्यात २८ मार्च रोजी थाला अर्थात महेंद्रसिंह धोनीच्या CSK चा सामना किंग कोहली विराटच्या RCB शी झाला. या सामन्यात आरसीबीनं चेन्नईचा मोठा पराभव केला. पण एकीकडे दोन्ही बाजूचे चाहते मैदानात या सामन्याचा आनंद लुटत असताना दुसरीकडे स्टेडियममध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं स्पष्ट झालं. या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर क्रिकेट चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले. पण चेन्नई पोलीस अशा चोरट्यांसाठी आधीच सज्ज होते. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत तब्बल ८४ मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं.
२८ मार्च रोजी झालेल्या सामन्यासाठी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर तब्बल ३५ हजारांहून जास्त क्रिकेटचाहत्यांनी हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान चेन्नई पोलिसांना स्टेडियममधून मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीला गेल्याचे अलर्ट आले. इतक्या गर्दीत मोबईल चोरट्यांचा माग घेणं कठीण काम होऊन बसतं. पण चेन्नई पोलिसांच्या ‘चेन्नई सिंघम’मुळे हे काम पोलिसांसाठी सोपं झालं आणि त्यांनी अवघ्या दोन दिवसांत चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून काढले.
CCTV व शोध यंत्रणेचा उत्तम मेळ!
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यात आता १२० अतिरिक्त कॅमेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे स्टेडियममधील प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांना बारीक लक्ष ठेवणं सोपं झालं आहे. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘चेन्नई सिंघम’ने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.
काय आहे ‘चेन्नई सिंघम’?
‘चेन्नई सिंघम’ हे चेन्नई पोलिसांनी खास तयार करून घेतलेलं एक फेस रेकग्निशन अर्थात चेहरे ओळखणारं सॉफ्टवेअर असून त्याला स्टेडियममध्ये बसवण्यात आलेले सर्व CCTV कॅमेरे संलग्न करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय चेन्नई पोलीस संपूर्ण स्टेडियममध्ये विखुरलेले असतात. त्यातून, सर्व क्रिकेट चाहत्यांवर, त्यांच्या कपड्यांवर, त्यांनी सोबत आणलेल्या बॅनर्सवरील शब्दांवरही पोलिसांची करडी नजर असते. यातूनच चेन्नई पोलिसांनी वेगाने तपास करून हे ८४ मोबाईल फोन शोधून काढले आहेत.
“संपूर्ण स्टेडियममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही क्यूआर कोड लावले आहेत. मोबईल चोरीसंदर्भातला अलर्ट पाठवण्यासाठी कुणीही हा क्यूआर कोड स्कॅन करू शकतो. आम्हाला त्या दिवशी क्यूआरच्या माध्यमातून अलर्ट मिळाल्यानंतर आम्ही त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेऊन संशयित आरोपी शोधून काढले. ‘चेन्नई सिंघम’च्या एआय प्रणालीचा वापर करून केलेल्या तपासा आम्हाला माहिती मिळाली. चोरट्यानं एखाद्या क्रिकेटचाहत्यासारखेच कपडे घातले होते. त्याच्या अंगावर CSK चा शर्ट होता”, असं चेन्नईचे सहपोलीस आयुक्त विजय कुमार यांनी सांगितलं.
क्रिकेट चाहत्यांबाबतचं निरीक्षण!
दरम्यान, विजयकुमार यांनी यासंदर्भात क्रिकेट चाहत्यांबाबतचं निरीक्षणही मांडलं. “बहुतेक क्रिकेट चाहते हे गटांमध्ये किंवा किमान दोघं तरी असतात. जर कुणीतरी एकटा आला आणि सामन्याचा आनंद लुटत नसेल किंवा आसपास कुणाशी बोलत नसेल, तर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवतात. त्या सामन्यात चोरी करणाऱ्या या व्यक्तीला सामना पाहण्यात रस नव्हता. त्याला वेगळं काहीतरी हवं होतं. जरा तपास केल्यावर आमच्या लक्षात आलं की त्याची टोळी संपूर्ण स्टेडियममध्ये विखुरलेली आहे. आम्ही दुसऱ्याच दिवशी त्यांची माहिती कढली आणि वेल्लोरहून त्यांना अटक केली”, असं ते म्हणाले.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण ८४ फोन जप्त केले असून आरोपींच्या टोळीला गजाआड केलं आहे. यापैकी काही फोन हे बाहेरून तर बहुतांश फोन हे २८ मार्च रोजीच्या CSK Vs RCB सामन्यात चोरीला गेलेले होते!