Chernobyl nuclear power plant Attack Video : युक्रेनमधील चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ मध्ये मोठी आण्विक दुर्घटना झाली होती, यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी अणुभट्टी ४ च्या अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी ‘न्यू सेफ कन्फाइनमेंट स्ट्रक्चर’ (NSC) उभारण्यात आले आहे. दरम्यान या इमारतीवर ड्रोन अदळल्याने स्फोट आणि आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (१४ फेब्रुवारी) घडल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दिली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. जगाला घातक किरणोत्सर्गापासून वाचवणार्या इमारतीवर शक्तिशाली बॉम्ब असलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला. त्यांनी या हल्ल्याची निंदा करत ही एक दहशतवादी कारवाई असल्याचे म्हटले आहे. तसेच अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचे धोकादायक परिणाम देखील नमूद केले आहेत.
या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तातडीने मदत कार्य केले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान प्राथमिक तपासात या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ देखील समोर आला असून स्फोट होऊन आग लागल्याची घटना देखील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Last night, a Russian attack drone with a high-explosive warhead struck the shelter protecting the world from radiation at the destroyed 4th power unit of the Chornobyl Nuclear Power Plant.
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 14, 2025
This shelter was built by Ukraine together with other countries of Europe and the world,… pic.twitter.com/mLTGeDYgPT
दरम्यान या घटनेनंतर IAEA ने माहिती दिली की, एनएससीच्या अंतर्गत भागाला या हल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही आणि प्रकल्पाच्या आत आणि बाहेर किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आणि स्थिर आहे. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षा दरम्यान अणुउर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
आयएईएचे डायरेक्टर जनरल राफायल ग्रोसी हे अणुउर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेवर भर देत म्हणाले की, “सुरक्षिततेच्या बाबतीत केलेल्या उपायांबद्दल निश्चित राहणं हा पर्यायच नाही, आणि आयएईए कायम हाय अलर्टवर असते”.
चेर्नोबिल घटना आणि झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाभोवती (Zaporizhzhia Nuclear Power Plant) अलिकडच्या काळात झालेल्या लष्करी हालचालींमुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केल. तसेच IAEA ची एक टीम चेर्नोबील येथे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितल.
नेमकं काय झालं होतं?
चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ साली मोठी दुर्घटना घडली होती. २६ एप्रिल रोजी येथील अणुभट्टी ४ चा स्फोट झाला होता. या दुर्घटनेमध्ये येथे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा प्रकल्प सध्या बंद आहे. मात्र आणखी किरणोत्सर्ग होऊ नये म्हणून या प्रकल्पाची तज्ज्ञ टीमकडून देखरेख करण्यात येते.
NSC काय आहे?
दरम्यान किरणोत्सर्ग रोखण्यासाठी येथे काँक्रीट आणि स्टील वापरून बंद एक इमारत बांधण्यात आली, परंतु ती खराब होऊ लागल्यामुळे किरणोत्सर्गाची गळती रोखण्यासाठी एनएससी, हे एक एक भल्या मोठ्या स्टीलच्या कमानीसारखे स्ट्रक्चर उभारण्यात आले, हे स्ट्रक्चर २०१६ मध्ये बांधून पूर्ण झाले.