बेंगळुरूतील घटनेवरून शिवसेनेचे  टीकास्त्र

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने वा आंदोलन करण्यात आले. कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला या निमित्ताने उभयतांकडून लक्ष्य करण्यात आले.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यासपीठावर फक्त शोभेसाठी ठेवत नाही. शिवाजी महाराज हा आमचा जाज्वल्य अभिमान आहे. भाजपमधील कर्नाटक सरकारने त्यांचा अपमान केल्यावर  महाराष्ट्राला तिडीक आलीच पाहिजे. पण भाजप नेत्यांनी मौन पाळले आहे, अशी टीका शिवसेना खासदार अर्रंवद सावंत यांनी रविवारी केली.

बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी शिवसेनेकडून मुंबईतील अनेक भागांमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपवर टीका करताना खासदार सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद आमच्या बरोबर असल्याची घोषणा भाजपने निवडणुकीसाठी केली. मात्र  शिवरायांचा अवमान झाल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ही किरकोळ घटना असल्याचे भाष्य करतात आणि केंद्रातील व राज्यातील भाजप नेते मौन पाळतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घटनेचा निषेधही केला नाही.

लालबाग परिसरात निदर्शने करताना महापौर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपवर टीका केली.

राष्ट्रवादीचे आंदोलन

बंगळुरूतील घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर दुधाचा अभिषेक करण्याचा आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. यानुसार ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji in bangalore defamation of the statue shiv sena nationalist demonstrations everywhere akp