Chhatrapati Shivaji Maharaj First Mosaic Portrait in Tokyo : आपल्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील विविध देशांत उत्सव साजरा केला जातो. त्यांची प्रतिमा घेऊन मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक शिवभक्त त्याच्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेली भावना व्यक्त करतो. अशाचपद्धतीने जपानमध्ये राहणाऱ्या एका मराठी व्यावसायिकानेही छत्रपती शिवाजी महाराजांना कलेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगभर पसरली आहे. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहतात. जपानच्या टोकियोमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक अभियंता रुपेश बांगर यांनीही एक कलाकृती सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त केला आहे. रुपेश बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पुशपिन मोझेक पोर्ट्रेट साकारले आहे. १० हजार पुशपिन्स वापरून तयार केलेली ही कलाकृती ३*४ फूट आहे. बांगर यांनी त्यांच्या शाळेतील माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध मोझेक कलाकार आबासाहेब शेवाळे यांच्याकडून प्रेरणा घेतली. ही कलाकृती पूर्ण करण्याकरता त्यांनी भारतातून साहित्य मागवले.

पोर्ट्रेटचे वैशिष्ट्य काय?

या पोर्ट्रेटचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाच टक्के भाग अपूर्ण ठेवला आहे. जेणेकरून प्रेक्षक स्वतः एक पुशपिन लावून प्रतिमा पूर्ण करण्यास योगदान देऊ शकतील. यामुळे सहभाग वाढत आहे. या सहभागामुळे जपानमधील भारतीय समुदाय जोडला जात आहे. एवढंच नव्हे तर कलाकृती पाहायला येणाऱ्यांमध्ये रुपेश बांगर जनजागृती करत असून प्रेरणादायी सत्रेही आयोजित केली आहेत.

भारतीयांसह अनेक कलाप्रेमींनी त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक केले. हे पोर्ट्रेट केवळ एक कलाकृती नसून, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे. रुपेश बांगर यांच्या या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाचा जागर केला असून, हा प्रकल्प त्यांच्या भविष्यातील कलात्मक प्रवासाची सुरुवात आहे.

Story img Loader