छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात नक्षलवादीही सक्रीय झाले आहेत. बस्तर परिसरात नक्षलवाद्यांनी पोस्टर्स आणि बैठकीच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपावर बहिष्कार टाकण्यास सांगत आहेत. नक्षलवाद्यांनी जंगलात लावलेल्या पोस्टर्सवर ‘बायकॉट फेक छत्तीसगढ़ चुनाव’ तर काही पोस्टर्सवर कॉर्पोरेट आणि हिंदू फॅसिस्ट भाजपावर बहिष्कार टाका आणि दुसऱ्या राजकीय पक्षाला लोक न्यायालयात उभे करा, असे आवाहन केले आहे. सीपीआयने (माओवादी) पोस्टर्स विविध ठिकाणी लावले आहेत.

दुर्गम भागात अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. देशी-विदेशी कॉर्पोरेट घराणे आणि ब्राह्मण, हिंदुत्व फॅसिस्ट भाजपाला पळवून लावा. मत मागणाऱ्या इतर पक्षांना लोक न्यायालयात उभे करा, असे एका पोस्टरवर लिहिले आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये बनावट छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाका. जनता सरकारला मजबूत करेल, त्यांचा विस्तार करेल, जनयुद्धाची तीव्रता वाढवेल असे यात म्हटले आहे.

जे ग्रामस्थ मतदान करुन येतील त्यांचे हात कापले जातील, अशी धमकीच नक्षलवाद्यांनी दिल्याची चर्चा आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे पोस्टर्स जप्त केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. नक्षलवादी हिंसक कारवाई करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Story img Loader