Chhattisgarh News NCC Camp : छत्तीसगडच्या बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका एनसीसी कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज अदा करण्यास भाग पाडण्यात आलं आहे. यापैकी बहुसंख्य विद्यार्थी गैर-मुस्लीम होते. गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबर ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जण शिक्षक आहेत, तर एक विद्यार्थी आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवतराई गावात ही घडना घडली आहे. या गावात २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान एनसीसी कॅम्प (शिबीर) भरवण्यात आला होता. या एनसीसी शिबिरात १५९ विद्यार्थ्यांना शिक्षकांनी नमाज अदा करण्यास भाग पाडलं होतं. या १५९ पैकी केवळ ४ विद्यार्थी मुस्लीम होते. तर, उर्वरित १५५ विद्यार्थी गैर-मुस्लीम होते. त्यांच्यावर नमाज अदा करण्याची जबरदस्ती करण्यात आली.

सात शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थी व स्थानिक संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच विद्यार्थ्यांवर नमाज अदा करण्याची जबरदस्ती करणाऱ्या शिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज अदा करायला लावणारे शिक्षकही गैर-मुस्लीम

कोटा पोलिसांनी याप्रकरणी प्राध्यापक दिलीप झा, डॉ. मधुलिका सिंह, डॉ. ज्योती वर्मा, डॉ. नीरज कुमारी, डॉ. प्रशांत वैष्णव, डॉ. सूर्यभान सिंह, डॉ. बसंत कुमार, टीम कोअर लीडर आयुष्मान चौधरी (विद्यार्थी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका बाजूला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारताचा पाकिस्तानबरोबर संघर्ष चालू आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता, तसेच काही पर्यटकांना कलमा म्हणण्यास सांगितलं होतं. त्यामुळे देशातील काही भागांत धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे. समाजमाध्यमांवर संतापची लाट उसळली आहे. अशातच बिलासपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.