भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी यांनी दारुमुळे होणारे गुन्हे रोखण्यासाठी सरकारला दारुला गांजा व भांगचा पर्याय देण्याची आणि त्याला प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर काँग्रेसकडून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या वक्तव्याचा विरोध करत कोणत्याही प्रकारचं व्यसन वाईटच असतं, असं मत व्यक्त केलं. तसेच त्यांना गांजा हवा असेल तर त्यांनी आपल्या केंद्रातील मोदी सरकारकडे देशभरात गांजा व भांग कायदेशीर करण्याची मागणी केली पाहिजे, असा टोलाही लगावला. ते रविवारी (२४ जुलै) दिल्लीहून रायपूरला आल्यानंतर विमानतळावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुपेश बघेल म्हणाले, “केंद्रीय तपास संस्था मुंबईत १० ग्रॅम गांजा जप्त करण्यासाठी धाडी टाकतात आणि इकडं भाजपाचे ज्येष्ठ आमदार गांजाच्या सेवनाला पाठिंबा देतात. गांजावर बंदी आहे. त्यामुळे भाजपा आमदार मूर्ती यांना गांजा सेवन करायचे असेल तर त्यांनी सर्वात आधी केंद्रातील मोदी सरकारकडे गांजाला परवानगी देण्याची मागणी करावी.” यावेळी बघेल यांनी व्यसन कोणत्याही स्वरुपाचं असलं तरी ते घातकच असतं, असंही नमूद केलं.

विलासपूर जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते अभय राय म्हणाले, “समाजाला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढायचं सोडून तीन वेळा आमदार व माजी आरोग्यमंत्री कृष्णमूर्ती बंधी व्यसनांना प्रोत्साहन देणारी वक्तव्ये करत आहेत. व्यसनाचा पर्याय व्यसन असू शकत नाही.”

भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी नेमकं काय म्हणाले होते?

काँग्रेसने निवडणुकीत छत्तीसगडमध्ये दारुबंदी करू असं आश्वासन दिलं होतं. यावर बोलताना कृष्णमूर्ती बंधी म्हणाले होते, “राज्यात दारुबंदीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपण गांजा आणि भांगचा पुढे जाऊन विचार करायला हवा. जर लोकांना व्यसन करायचं असेल तर त्यांना गांजा, भांगसारखे पर्याय वापरण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे.”

हेही वाचा : “सबका साथ सबका विकास, एक धोका आहे” असदुद्दीन ओवेसींची मोदी सरकारवर टीका

“गांजा, भांग या व्यसनांमुळे बलात्कार, खून, दरोडा असे गुन्हे घडत नाहीत. दारुऐवजी गांजा आणि भांगचा सल्ला देताना आमदार मूर्ती यांनी हे आपलं व्यक्तिगत मत आहे,” असंही नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh cm bhupesh baghel comment on demand of bhang cannabis as alternative to liquor by bjp mla pbs