गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप आणि त्यासंबधी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयकडून होत असलेली कारवाई चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री ईडीच्या रडारवर आहेत. अशातच या प्रकरणात ईडीने गुरुवारी छत्तीसगडमध्ये एका सर्च ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या या कारवाईला चांगलं यशही मिळालं आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत ५.३९ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच या तपासात एक मोठं नाव समोर आलं आहे.
महादेव बेटिंग अॅप सिंडिकेटच्या तपासादरम्यान ईडीनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेल्या कॅश कुरिअर असीम दासची ईडीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान, त्याने सांगितलं की, बघेल नावाच्या एका राजकारण्याला मोठी रक्कम देण्याची त्याने व्यवस्था केली होती.
छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की ७ ते १७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव बेटिंग अॅपचे प्रवर्तक मोठ्या प्रमाणात रोख रक्कम छत्तीसगडमध्ये नेणार आहेत.
दरम्यान, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल ट्रायटन आणि इतर काही ठिकाणी छापेमारी केली. अनेक ठिकाणची झडती घेतली. यावेळी असीम दास हा निवडणुकीच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन दाखल झाला होता. ईडीने त्याला ताब्यात घेतलं. ईडीने असीम दासकडे असणारी ५.३९ कोटी रुपयांची रोख रक्कम त्याची कार आणि घरातून जप्त केली आहे.
असीम दासला अटक
असीम दासने चौकशीत सांगितलं की, जप्त केलेली रक्कम ही महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी एका ‘बघेल’ नावाच्या मोठ्या राजकारण्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईडीने महादेव अॅपच्या काही बेनामी बँक खात्यांची माहिती मिळवली आहे. या खात्यांमधील १५.५९ कोटी रुपये इतकी रक्कम गोठवली आहे. मिळालेली माहिती, पुरावे आणि असीम दासच्या कबुलीनंतर ईडीने त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा >> अधोविश्व : ऑनलाइन बेटिंग अॅप
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना दिले तब्बल ५०८ कोटी रुपये
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने या प्रकरणात आधीच चार जणांना अटक केली आहे, तसेच ४५० कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे. त्याचबरोबर १४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने असीम दासची चौकशी केल्यानंतर आणि त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली आहे. तसेच महादेव नेटवर्कच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी एक असलेले आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक शुभम सोनी यांच्या ईमेल्सची तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार महादेव बेटिंग अॅप प्रमोटर्सद्वारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ईडी आता याप्रकरणी तपास करत आहे.