नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महादेव अॅपकडून ५०८ कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावला. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याला काहीच दिवस उरले असताना, ‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले.
कथितरित्या पैसे पोहोचवणाऱ्याच्या जबाबावरून ईडीने हा दावा केला. त्यानंतर बघेल यांनी एक्स या समाजमाध्यमावरून याविषयी विस्तृत खुलासा केला आणि ईडीचा दावा फेटाळून लावला. त्यामध्ये बघेल यांनी असे म्हटले आहे की, मी पूर्वी म्हणाल्याप्रमाणे भाजप ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यासारख्या संस्थांच्या मदतीने छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवू पाहत आहे. हा निवडणुकीपूर्वी माझी प्रतिमा मलिन करण्याचा हीन प्रयत्न आहे. महादेव अॅपह्णचा कथित तपास करण्याच्या नावावर ईडीने आधी माझ्या निकटवर्तीयांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर घरावर छापे टाकले आणि आता एका अज्ञात व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे माझ्यावर ५०८ कोटी घेण्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ओबीसी मतांसाठी भाजपची रणनिती; पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे दिल्लीत मंथन
‘ईडी’च्या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री बघेल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. बघेल यांना कथितरीत्या ५०८ कोटी रुपये पोहोचवणाऱ्या असीम दास याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त केल्यानंतर ईडीने त्याला अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महादेव अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची सध्या चौकशी चालू आहे.
निवडणुकीच्या तोंडावर..
काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये येत्या ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री भूपेश बघेल ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
ईडीची चलाखी पाहा, त्या व्यक्तीचा जबाब जाहीर केल्यानंतर एका लहानशा वाक्यात असे लिहिले आहे की, हा जबाब तपासाच्या अधीन आहे. जर तपास झालाच नाही तर एका व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे प्रेस रिलीज प्रसिद्ध केल्याने ईडीचा हेतू तर कळतोच, त्याशिवाय केंद्र सरकारच्या दुष्ट हेतूदेखील उघड होतो.
– भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड
ईडी, सीबीआय आणि आयटी हे भाजपचे सरकारी प्रचारकर्ते आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी त्यांना भीती दाखवण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे मोदीजींचे टूलकिट आहे.
– पवन खेरा, काँग्रेस नेते