राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. छत्तीसगडच्या टिकारपारा पोलीस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराजला पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. दरम्यान अटकेच्या कारवाईवरुन मध्य प्रदेश सरकराने नाराजी जाहीर केली आहे.
मध्य प्रदेश सरकारचा आक्षेप काय?
छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता कालीचरण महाराजला अटक करुन आंतरराज्य नियमांचं उल्लंघन केलं आहे. मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी संवाद साधत अटकेच्या प्रक्रियेसंबंधी निषेध नोंदवण्यास सांगण्यात आलं असून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आलं आहे असं मध्य प्रदेश सरकारने म्हटलं आहे.
“महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्याला अटक केल्याबद्दल आनंद की दु:ख”
दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेन बघेल यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. “मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्याला अटक केल्याबद्दल आनंदी आहेत की दु:खी हे स्पष्ट करावं,” असं म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी कालीचरण महाराजच्या कुटुंबीय आणि वकिलांना छत्तीसगड पोलिसांनी अटकेची माहिती दिली असल्याचं सांगितलं. तसंच २४ तासात कोर्टात हजर केलं जाणार असल्याचंही सांगितलं आहे.
कशी झाली अटकेची कारवाई?
रायपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी दूर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटकेची कारवाई केली. संध्याकाळपर्यंत पोलीस कालीचरण महाराजला घेऊन रायपूरमध्ये पोहोचतील”.
नेमकं प्रकरण काय?
महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता, काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते.
छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल
रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. IPC च्या कलम ५०५(२) [वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छा निर्माण करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे] आणि कलम २९४ [कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य] अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायपूरमध्ये एफआयआर दाखल होताच कालीचरण महाराज छत्तीसगडमधून पळून गेल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पथके पाठवली होती. त्यानंतर कालीचरण महाराजला रायपूरमधून अटक करण्यात आली.