छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलातर्फे (सीआरपीएफ) आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सीआरपीएफच्या दोन जवानांनी शाळेतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीआरपीएफ आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आरोपी जवानांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु आहे.
दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावात ३१ जुलैरोजी रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सुमारे ५०० विद्यार्थिनी सीआरपीएफच्या जवानांना राखी बांधणार होत्या. नक्षलवादग्रस्त भागात जनतेशी संवाद वाढवण्यासाठी सीआरपीएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून गेल्या ९ वर्षांपासून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ३१ जुलैरोजी कार्यक्रम सुरु असताना तीन मुली स्वच्छतागृहातून परतत होत्या. या तिघींना सीआरपीएफच्या दोन जवानांनी अडवले आणि त्यांची झाडाझडती घेतली. या प्रकाराची विद्यार्थिनींनी हॉस्टेलमधील वॉर्डनकडे तक्रार केली. लहान मुलींची झाडाझडती घेणे चुकीचे असल्याने शाळा प्रशासनाने जिल्हाधिकारी सौरभ कुमार यांच्याकडे हे प्रकरण नेले. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत तिन्ही विद्यार्थिनींकडून नेमके काय घडले हे जाणून घेतले. या दरम्यान शाळेतील महिला शिक्षकही तिथे उपस्थित होत्या. या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली असून सीआरपीएफने या घटनेचा स्वतंत्र तपास सुरु केला आहे. कोणत्या जवानांचा या घटनेत सहभाग होता याचा शोध घेतला जात असून जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समितीदेखील नेमली आहे. यामध्ये दंतेवाडा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा शिक्षण अधिकारी यांचा समावेश आहे.
हॉस्टेलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आम आदमी पक्षाच्या सोनी सोरी यांनी यावरुन पोलिसांवर टीका केली. मला पीडित मुलींना भेटू दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस आणि सीआरपीएफ हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.