गेल्या काही वर्षांमध्ये छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा वावर व कारवाया कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी ब्लास्टमध्ये दहा डआरजी जवान आणि त्यांच्या वाहनाचा चालक शहीद झाले आहेत. गुप्ततर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी मोहीमेवरून हे सर्व पोलीस परत येत असताना ही घटना घडली. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
डीआरजी अर्थात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे हे सर्व पोलीस होते. नक्षलवाद्यांशी सामना करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या स्थानिकांचा या पथकामध्ये समावेश होता. बस्तरमधील नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये डीआरजीची मोठी मदत प्रशासनाला झाली आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं ट्वीट
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यानंतर ट्वीट केलं आहे. “अरणपूरमधील दंतेवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी पथक तिथे कारवाईसाठी निघाले असता नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये १० डीआरजी जवान आणि त्यांच्या वाहनाचा चालक असे ११ जण शहीद झाल्याचं वृत्त अत्यंत दु:खद आहे. राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं भूपेश बघेल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नक्षलवाद्यांच्या पद्धतीमध्ये बदल
दरम्यान, सीआरपीएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची कारवायांच्या पद्धत बदलली आहे. आता मोठ्या संख्येतल्या जवानांवर हल्ला करण्याऐवजी ते कमी संख्येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याची पद्धत नक्षलवाद्यांकडून अवलंबण्यात येत आहे.