देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वजण त्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग पसरत असून हा संसर्ग रोखण्यासाठी देशात काही निर्बंधासह लॉकडाउन लावण्यात आला आहे. या करोना काळात डॉक्टर, नर्स रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र डॉक्टर, नर्स न भीता रुग्णांची सेवा करत आहेत. या आरोग्य कर्मचार्यांना करोना योद्धांचा दर्जा तर मिळाला. परंतु छत्तीसगडच्या नर्सचे समर्पण पाहता असे दिसते की या योद्ध्यांचे बलिदान हे शहादांपेक्षा कमी नाही.
छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे. एक नर्स आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नर्स प्रभा बंजारे यांची पोस्टिंग मोरमाली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, खैरवार खुर्द येथे होती. त्या ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होत्या. गरोदरपणात गावात भाड्याने खोली घेऊन त्या एकट्याच राहात होत्या. तिथून त्या रुग्णालयात जात असत.
प्रभाचे पती भेजराज म्हणाले, “प्रभा ९ महिन्यांच्या गर्भवती अवस्थेत कोविडमध्ये ड्युटी करत राहिली. ३० एप्रिल रोजी प्रसूतीसाठी तिला कवर्धा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिने सिझेरियन ऑपरेशनद्वारे एका मुलीला जन्म दिला. यावेळी रुग्णालयात राहत असताना तिला बर्याच वेळा ताप आला. डिस्चार्जनंतर घरी आले असता त्यांना खोकला देखील जाणवू लागला.”
प्रभा यांचा अॅन्टीजेन चाचणीत अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कवर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे त्यांना रायपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना २१ मे रोजी रात्री त्यांचे निधन झाले. पती भेजराज यांनी सांगितले की, “त्यांनी प्रभाला अनेक वेळा रजा घेण्यास सांगितले, परंतु गर्भवती असतानाही प्रभाने तिचे कर्तव्य बजावले.”