छत्तीसगडमध्ये आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. नर्सवर बलात्कार करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक आरोप अल्पवयीन असून चौथा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> Video: भाजपा मंत्र्यानं तक्रार करायला आलेल्या महिलेच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछीपी या गावात शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. येथील आरोग्य केंद्रात पीडित नर्स एकटीच काम करत होती. हीच संधी साधून आरोपींनी संध्याकाळी साधारण ३ वाजेच्या सुमारास आरोग्य केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी पीडित नर्सला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रण केले असून याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडित नर्सला दिली आहे. तसा दावा पीडित नर्सने केला आहे.
हेही वाचा >>> केरळमधील CPM नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश पुन्हा चर्चेत!
या घटनेनंतर पीडित नर्सने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीकडून भुपेश बघेल यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर महेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार विनय जैस्वाल यांनी भाजपा या घटनेचे राजकारण करत असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >>> “बलात्कारानंतर चिमुकलीला जिवंत सोडण्याची ‘दया’ आरोपीनं दाखवली म्हणून..”, उच्च न्यायालयानं कमी केली शिक्षा!
दरम्यान, या घटनेनंतर दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच छत्तीसगड सरकारने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही काम बंद करू, असा इशाराही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.