छत्तीसगढ येथील कांकेर जिल्ह्यातील पखांपूरमध्ये एक अन्न पुरवठा निरीक्षकाचा मोबाईल फोन तलावात पडला होता. यासाठी या अधिकाऱ्याने ४ दिवस तलावातून लाखो लीटर पाण्याचा उपसा केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, उपसा करण्यात आलेल्या पाण्याची रक्कम अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पखांपूरमधील अन्न पुरवठा निरीक्षक राजेश विश्वास २१ मे रोजी आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी परालकोट जलाशय येथे गेले होते. तेव्हा राजेश विश्वास यांचा मोबाईल फोन तलावात पडला. अधिकाऱ्याने मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी ३० एचपीच्या दोन मोटरने ४ दिवस २१ लाख लीटर पाण्याचा तलावातून उपसा केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजेश विश्वास यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, तीन दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : करोनापेक्षा भयंकर रोग येतोय? ‘डिसीज एक्स’बद्दल WHO च्या इशाऱ्याने टेन्शन वाढवलं
उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी राजेश विश्वास यांचं निलंबन केलं आहे. त्यांनी आदेश जारी करत म्हटलं की, “अन्न पुरवठा निरीक्षक राजेश विश्वास यांनी आपल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी चार दिवस परलकोट तलावातील २१ लाख लीटर पाण्याचा उपसा केला. याप्रकरणाची पखांजूर येथील एसडीएम यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे.”
तसेच, राजेश विश्वास यांना जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी आरसी धिवार यांनी पाणी उपसण्यासाठी तोंडी परवानगी दिल्याचं समोर आलं. याबाबतही जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी आरसी धिवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा : अपहरण झालेली मुलगी तब्बल १७ वर्षांनी सापडली, पोलीस तपासात समोर आलं वेगळंच प्रकरण
धिवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीत सांगितलं की, “राजेश विश्वास यांनी प्रसारमाध्यमांत दिलेल्या निवेदनात आरसी धिवार यांच्याकडं तोंडी परवानगी मागितली. पण, वरिष्ठांची परवानगी न घेता धिवार यांनी तोंडी परवानगी दिली. त्यांनी गैरवर्तन केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.”