रायपूर : भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांकडून ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने भात खरेदी, महिलांना वर्षांला १२ हजार रुपये, गरीब कुटुंबांतील महिलांना ५०० रुपयांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, एक लाख तरुणांना रोजगार अशा आश्वासनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला ‘छत्तीसगडसाठी मोदींची २०२३ ची हमी (गॅरंटी)’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये वरीलप्रमाणे योजनांसह ‘कृषक उन्नती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिएकर २१ क्लिंटल भात ३१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंतप्रधान निवास योजनेंतर्गत १८ लाख घरे, अतिरिक्त तेंदू पानांसाठी ४,५०० रुपयांचा ‘बोनस’चा जाहीरनाम्यात समावेश आहे. राज्यातील नोकरभरती घोटाळय़ाची चौकशी, राज्यात ‘छत्तीसगड उद्यम क्रांती योजना’, त्याअंतर्गत तरुणांना उद्योगासाठी ५० टक्के अनुदानासह बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

हेही वाचा >>> ‘राजीव गांधी यांनी बाबरीचे कुलूप उघडले होते’, राम मंदिराच्या श्रेयाबाबत कमलनाथ यांनी भाजपाला सुनावले

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पारदर्शकता ठेवली जाऊन पाच वर्षांत त्यात कोणताही घोटाळा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे शहा यांनी सांगितले.

मतांसाठी चंद्राबाबूंचे कौतुक करण्याची चढाओढ

हैदराबाद : तेलंगण विधानसभा निवडणूक तेलुगु देशम लढवणार नसल्याचे पक्षाध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले आहे. मात्र गेल्या म्हणजेच २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगु देशमला साडेतीन टक्के मते तसेच दोन जागा मिळाल्या होत्या. आता ही मते आपल्याकडे वळावीत यासाठी विविध पक्षांचे नेते नायडू यांच्यावर कौतुकाचा वर्षांव करत आहेत.

चंद्राबाबूंची नुकतीच कारागृहातून सुटका झाला. निधी गैरव्यवहारप्रकरणी नायडू ५३ दिवस कारागृहात होते. खम्मम येथून निवडणूक लढणारे भारत राष्ट्र समितीचे उमेदवार व राज्यातील मंत्री पी.अजय कुमार यांनी नायडू यांची अटक बेकायदेशीर होती. नायडूंचे वर्णन त्यांनी राष्ट्रीय नेते असे केले. नायडूंना पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केल्याची आठवण त्यांनी करून दिली. खम्मममधील काँग्रेस उमेदवार तुम्माला नागेश्वर राव यांनीही नायडूंच्या सुटकेचे स्वागत केले.

गेहलोत यांचे वसुंधरा राजेंना वादविवादाचे आव्हान

जयपूर  : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीर केलेल्या सात हमी योजनांबद्दल माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वादविवादात सहभागी व्हावे असे आव्हान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी दिले. काँग्रेसने जाहीर केलेल्या सात हमी योजना या विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत असे गेहलोत यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले. वसुंधरा राजे यांनी गुरुवारी बाली, बिलारा आणि पाली येथे भाजपचा प्रचार सुरू करताना ‘काँग्रेसच्या खोटय़ा आश्वासनांना फसू नका’, असे आवाहन मतदारांना केले होते. ‘काँग्रेसला स्वत:ची हमी नसताना ते लोकांना हमी कसे काय देऊ शकतात’, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला गेहलोत यांनी शुक्रवारी उत्तर दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh polls bjp released manifesto trying to attract youth and women in chhattisgarh zws