छत्तसीगडमधील सुकमा जिल्ह्यातील दंडकारण्याचा (बस्तर) रामायणात उल्लेख आहे. बस्तर आणि भगवान श्रीरामाचं घट्ट नातं आहे. हे एक असं घटदाट वन आहे जिथे भगवान श्रीरामांनी काही दिवस वास्तव्य केल्याचा दावा केला जातो. सुकमामधील केरलापेंदा गावात १९७० मध्ये रामभक्तांनी एक मंदिर बांधलं होतं. ३३ वर्षे या मंदिरात दररोज पूजाअर्चा होत होती. मात्र २००३ मध्ये माओवाद्यांनी हे मंदिर जबरदस्तीने बंद केलं होतं. गेल्या २१ वर्षांपासून बंद असलेलं श्रीरामाचं हे मंदिर आता भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. सीआरपीएफच्या जवानांनी हे मंदिर उघडून, मंदिराची स्वच्छता करून भाविकांसाठी खुलं केलं आहे. मंदिर उघडल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी मंदिात दिवा लावला, तिन्ही मुर्त्यांना हार-फुलं वाहून पूजा केली. तसेच श्रीरामाची आरतीदेखील केली.
केरलापेंदामधील या मंदिरात पाच दशकांपूर्वी भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र ९० च्या दशकानंतर या भगात माओवाद्यांचा उद्रेक वाढला. अशातच २००३ मध्ये माओवाद्यांच्या भितीने मंदिरातील पूजा बंद करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी हे मंदिर पूर्णपणे बंद करून कुलूप लावण्यात आलं. जे आता उघडण्यात आलं आहे.
बिहारी महाराज यांनी १९७० मध्ये हे मंदिर उभारलं होतं असं स्थानिक सांगतात. हे मंदिर बांधण्यासाठी आसपासच्या गावांमधील लोकांनी वर्गणी गोळा करून पैसे जमवले होते. तसेच लोकांनीच सिमेंट, दगड, फरशी आणि बांधकामासाठी लागणारं इतर साहित्य डोक्यावरून वाहून या घनदाट जंगलात नेलं होतं. गावकऱ्यांनी ७० ते ८० किमी चालत जाऊन सर्व साहित्य तिथे पोहोचवलं होतं. त्यानंतर हे मंदिर उभारण्यात आलं. मंदिर बांधल्यानंतर आसपासच्या भागातील लोक रामभक्त झाले आणि कित्येक लोकांनी मांसाहाराचं सेवन बंद केल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
हे ही वााचा >> “लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
केरलापेंदा गावातील ९५ टक्क्यांहून अधिक लोक शाकाहारी असल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला. तसेच गावातील लोकांना मद्याचं व्यसन नसून याचं श्रेय बिहारी महाराज आणि या मंदिराला जातं असंही गावकऱ्यांनी सांगितलं. या गावात पूर्वी मोठी यात्रा भरायची. अयोध्येतून साधू आणि संन्यासी यायचे. परंतु, या भागात माओवाद्यांचा उद्रेक वाढल्यानंतर यात्रा बंद पडली. तसेच माओवाद्यांनी मंदिरातील पूजाअर्चा बंद केली. पाठोपाठ मंदिराला कुलूप लावल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.