छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील बुंदापारा येथे असलेल्या शासकीय शाळेत एक शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, यामागचं कारण देखील तितकंच गंभीर आहे. या शिक्षकाने कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला म्हणून चिडून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपवास करणं चुकीचं वाटल्याने राग येऊन या शिक्षकाने मुलांना मारहाण केली. त्याचसोबत यावेळी या शिक्षकाने हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करून धार्मिक भावना दुखावल्याचं देखील म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

चुकीची कबुली आणि माफी

कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोंडागाव जिल्ह्यातील गिcरोला ग्रामपंचायतीच्या बुंदापारा येथील माध्यमिक शाळेत ही संपूर्ण घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल चांगलाच व्हायरल झाला आहे. वृत्तानुसार, या प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर गर्दी केली. या जमावाने आरोपी शिक्षकाला घेरलं. संतप्त लोकांना पाहून अखेर शिक्षकाने आपली चूक कबूल केली आणि हात जोडून माफी मागितली. दरम्यान, माहिती मिळताच कोंडागाव पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी या संतप्त जमावाला पांगवलं.

तात्काळ निलंबन

विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देताना असं सांगितलं कि, “शिक्षक चरण मरकाम हे मंगळवारी शाळेत पोहोचले. वर्गात येताच त्यांनी जन्माष्टमीसाठी उपवास केलेल्या विद्यार्थ्यांची नावं विचारली. त्याप्रमाणे, मुलांनी हात उंचावून याबाबतची माहिती दिली. तेव्हा या शिक्षकाने उपवास केला म्हणून या मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि हिंदू देव-देवतांविरुद्ध आक्षेपार्ह विधानं करण्यास सुरुवात केली.”

शाळेचे मुख्याध्यापक चंद्रगुप्त तुरकर यांनी याबाबत सांगितलं कि, जेव्हा मुलांना मारहाण केल्याची घटना समोर आली तेव्हा मी शिक्षकाला बोलावून चौकशी केली. पुढे मी या घटनेची माहिती विभागीय उच्च अधिकाऱ्यांना दिली. तर, गावकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी पुष्पेंद्र कुमार मीणा यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी छत्तीसगढ नागरी सेवा (आचार) नियम १९६५ च्या विरोधात धार्मिक भावना दुखावणं आणि समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न हे शिक्षकाचं गंभीर गैरवर्तन असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.