केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग राजनची चौकशी करणार
किमान सत्तर गुन्हय़ांत हवा असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याला अखेर सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अटक करून भारतात आणण्यात यश आले आहे. राजन याला इंडोनेशियातून आज सकाळी विमानाने दिल्लीत आणण्यात आले. आज त्याला भारतीय हवाई दलाच्या गल्फस्ट्रीम-३ या खास विमानाने त्याला बाली येथून दिल्लीला आणण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता त्याला पालम विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर तेथे छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची गर्दी उसळली होती, पण राजन कुठल्या गाडीत आहे हे समजू दिले गेले नाही. सीबीआयच्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली.
दिल्ली व मुंबई येथे त्याच्यावर खंडणी, अमली पदार्थ तस्करी, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजनची चौकशी सीबीआय म्हणजे केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे देण्यात आली आहे. राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असून, दिल्लीतील पालम विमानतळावर उतरल्यानंतर त्याला थेट सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याला वेगळय़ाच मोटारीतून नेण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव राजन याला दिल्ली न्यायालयात नेले जाणार नाही तर दंडाधिकाऱ्यांना सीबीआयच्या मुख्यालयात बोलावून त्याला कोठडी दिली जाईल. त्याची सक्तीने वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्याला दिल्लीतच ठेवले जाणार असून, विविध चौकशी संस्थांचे अधिकारी येथे येऊन त्याचे जाबजबाब घेतील. दाऊद विरोधात आणखी पुरावे मिळवण्यासाठी त्याच्या जाबजबाबांचा वापर होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा