कुख्यात गुंड छोटा राजनचे सरकारशी खास संबंध असल्याचे विधान दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केले आहे. ते शुक्रवारी दिल्ली साहित्य संमेलनातील चर्चासत्रात बोलत होते. यावेळी कुमार यांनी छोटा राजन आणि भारतीय सरकार यांचे विशेष नाते असल्याला दुजोरा दिला. या चर्चासत्रादरम्यान नीरज कुमार यांनी राजन आणि भारतीय सरकार यांच्यातील विशेष संबंधाबाबत बोलताना ‘हो तसे आहे’, असे सूचक उत्तर दिले. त्यानंतर या चर्चासत्राच्या सूत्रधार मधू त्रेहान यांनी छोटा राजन आणि सरकारचे असलेले खास संबंध हे सत्य आहे किंवा फक्त दंतकथा आहे की निव्वळ अफवा आहे, असे विचारले असता नीरज कुमार यांनी, मी जर हे म्हणतो आहे, तर ते सत्य आहे, असे म्हटले.
मागील वर्षी नीरज कुमार यांचे पोलीस कारकीर्दीतील अनुभवांवर आधारित ‘डी फॉर डॉन’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकात नीरज कुमार यांनी जून २०१३ मध्ये मला दाऊदचा फोन आल्याचा दावा केला होता. याशिवाय, १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर मी दाऊदशी तीनदा बोललो होतो, असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

Story img Loader