गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा करोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. राजनचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्याचदरम्यान त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. मात्र छोटा राजन अद्याप जिवंत असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच राजनचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियन पोलिसांच्या मदतीने पकडून भारतात आणलं होतं. विमानतळावर त्याला पोलिसांच्या ताब्यात देत असताना राजनचा शेवटचा फोटो समोर आला होता. त्यानंतर थेट करोना काळात राजनचा रुग्णालयात उपचार घेतानाचा एक फोटो समोर आला होता. त्याचदरम्यान राजनचा मृत्यू झाल्याची बातमीदेखील समोर आली होती. मात्र राजन अद्याप जिवंत असून त्याचा नवीन फोटो समोर आला आहे.
छोटा राजन पूर्णपणे ठणठणीत असून तब्बल नऊ वर्षांनी त्याचा फोटो समोर आला आहे. राजन सध्या तिहारमधील दोन नंबरच्या तुरुंगातील एका सुरक्षित बराकीत तुरुंगवास भोगत आहे. तर तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्येच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. करोना काळात राजनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो जिवंत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. लॉकडाऊन काळातला राजनचा मास्क परिधान केलेला एक फोटो नुकताच समोर आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गँग राजनला तुरुंगात ठार करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजनच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा >> “फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
इंडोनेशियामधून अटक
ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडोनेशियातील पोलिसांनी राजनला अटक केली होती. सीबीआयच्या (इंटरपोल) सांगण्यावरून बाली पोलीसांनी २५ ऑक्टोबरला मोहन कुमार या भारतीय व्यक्तीला अटक केली होती. ही व्यक्ती राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन असून तो फरारी म्हणून घोषित होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला भारतात प्रत्यार्पित करण्यात आलं होतं. अटकेच्या आदल्या दिवसापर्यंत छोटा राजन ऑस्ट्रेलियात होता. भारतीरय गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावरच होती. २५ ऑक्टोबर रोजी तो इंडोनेशियातील बाली या शहरात दाखल झाला आणि त्याच दिवशी इंडिनेशियन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर दिल्लीत त्याची काही दिवस चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून दाऊद इब्राहिमबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मुंबईसह देशभरात त्याने केलेल्या विविध गुन्ह्यांप्रकरणी त्याच्यावर खटले चालवण्यात आले. यापैकी काही गुन्हे सिद्ध झाले असून तो तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यानच्या काळात मुंबई पोलिसांनी राजनचा ताबा मागितला होता. मात्र त्याला तिहारमध्येच ठेवण्यात आलं.