कुख्यात डॉन छोटा राजन याला मंगळवारी रात्रीच बालीहून भारतात पाठविण्यात येईल, अशी माहिती इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी दिली. छोटा राजनला भारतीय तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत आणि मंगळवारी रात्रीच त्याला बालीमधून भारताकडे रवाना केले जाईल, असे इंटपोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, छोटा राजनला मुंबईमध्ये आणण्यात येणार असून, त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
छोटा राजनला या काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आली. सध्या तो तेथील विशेष पोलीस पथकाच्या सुरक्षेत कैदेत आहे. त्याला आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि मुंबई पोलीसांचे पथक कालच बालीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर छोटा राजनचा ताबा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर मंगळवारी त्याला भारतीय तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी थेट संबंध असल्याचा आरोप छोटा राजन याने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले, असेही त्याने म्हटले आहे. काही पत्रकारांशी बोलताना त्याने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले.

Story img Loader