कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाली असली, तरी मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फारसा काहीही उपयोग होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
छोटा राजन हा कधीच दाऊद इब्राहिमच्या फार जवळ नव्हता. त्याच्याकडे दाऊदबद्दल फारशी माहितीही नाही. त्यामुळे त्याला भारतात आणले तरी त्यामुळे दाऊदपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फारसा काही उपयोग होणार नसल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी छोटा राजनला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आली. सध्या तो तेथील विशेष सुरक्षापथकाच्या ताब्यात आहे.
आपल्याला लवकरात लवकर भारतात परत यायचे आहे, अशी इच्छा त्याने काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर आपण आत्मसमर्पण केले नसून, आपल्याला अटक करण्यात आली असल्याचेही त्याने म्हटले आहे. छोटा राजनला अटक झाली नसून त्याने आत्मसमर्पण केल्याची चर्चा होती. मात्र, त्याने ही चर्चा फेटाळून लावली. दाऊद इब्राहिमवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून छोटा राजनचा वापर केला जायचा, अशीही माहिती काही सूत्रांकडून मिळाली. छोटा राजन हा सातत्याने भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात राहायचा आणि त्यानेच आपल्याला अटक करवून घेतली असल्याचेही वृत्त वृत्तवाहिनीने दिले आहे.

Story img Loader